अपर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय ; ट्रॉलरवरील साहित्य जप्तीसह दंड वसूल करणार…
मालवण, ता. ०७ : अनधिकृतरीत्या एलईडीद्वारे मासेमारी करताना पकडल्यानंतर जप्त केलेला गोव्यातील फ्रान्सिस्को सिल्वेरा याचा ट्रॉलर बंधपत्र सादर केल्यानंतर मुक्त करण्याचा निर्णय अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी दिला. यात यापूर्वी तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार ट्रॉलरवरील साहित्य जप्त करण्याचा आणि दंडात्मक कारवाईचा आदेश कायम ठेवण्यात आला आहे.
दरम्यान मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी तेजस्विनी करंगुटकर यांच्याशी संपर्क साधला असता आज अपर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत दिलेल्या निर्णयानुसार महसूल अधिकार्यांच्या उपस्थितीत ट्रॉलरवरील साहित्य जप्त करण्याची कारवाई केली जाणार आहे. संबंधित ट्रॉलर मालकाने दंड भरून बंधपत्र सादर केल्यानंतर ट्रॉलर मुक्त केला जाणार असल्याची माहिती दिली.
गेल्या महिन्यात मत्स्य व्यवसाय विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत समुद्रात अनधिकृतरीत्या एलईडीद्वारे मासेमारी करताना साओ पाउलो व सी एंजेल हे गोव्यातील दोन ट्रॉलर पकडण्यात आले होते. या दोन्ही ट्रॉलरवर कारवाईचा प्रस्ताव मत्स्य व्यवसाय विभागाने तहसीलदारांकडे सादर केला होता. यावर झालेल्या सुनावणीत तहसीलदार अजय पाटणे यांनी दोन्ही ट्रॉलर जप्त करण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर साओ पाउलो या ट्रॉलरचे मालक फ्रान्सिस्को सिल्वेरा यांना ३ लाख ८ हजार ५०० रुपये तर सी एंजेल या ट्रॉलरचे मालक अल्बर्ट डिसिल्वा यांना ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. या दोन्ही ट्रॉलर्सचे नोंदणी प्रमाणपत्र व मासेमारी परवाना रद्द करण्याची कार्यवाही संबंधित परवाना अधिकार्यांनी करावी असे तत्काळ कळविण्यात यावे असे आदेशही तहसीलदारांनी दिला होता.
तहसीलदारांनी दिलेल्या निर्णयानुसार हे दोन्ही ट्रॉलर जप्त करून देवगड येथील बंदरात नेण्यात आले होते. यात गोव्यातील फ्रान्सिस्को सिल्वेरा यांनी अपर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात अपील दाखल केले होते. यावरील सुनावणी आज झाली. यात तहसीलदारांनी दिलेल्या निर्णयातील साहित्य जप्त, दंड कायम ठेवत सिल्वेरा याने आवश्यक बंधपत्र सादर केल्यानंतर ट्रॉलर मुक्त करण्याचा निर्णय दिला आहे.
दरम्यान मत्स्य व्यवसाय विभागाकडून ट्रॉलरवरील साहित्य जप्त करण्याची कार्यवाही अद्याप झालेली नाही. महसूल अधिकार्यांच्या उपस्थितीत हे साहित्य जप्त केले जाणार आहे. शिवाय दंडात्मक रक्कम भरून आवश्यक बंधपत्र दिल्यानंतरच ट्रॉलर मुक्त केला जाणार असल्याचे मत्स्यव्यवसायच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले.