ओरोस.ता.०८: बॅ नाथ पै सेवांगण, मालवणच्या कट्टा शाखेच्यावतीने दरवर्षी बापूभाई शिरोडकर यांच्या स्मृति प्रत्यर्थ दिला जाणारा पुरस्कार यावर्षी डॉ पल्लवी सुप्रिया प्रभाकर सापळे यांना जाहिर झाला आहे. २० जानेवारी रोजी दु ३ वा. बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे बॅ नाथ पै सेवांगण मालवण अध्यक्ष वकील देवदत्त परुळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे. प्रशस्तिपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
डॉ पल्लवी सापळे यांनी आपल्या हुशारीच्या जोरावर राज्यातील सर्वात मोठे असलेल्या वैद्यकीय महाविद्यालय ग्रॅन्ट मेडिकल कॉलेज मुंबई आणि सर जेजे ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या अधिष्ठाटा (डीन) पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. त्यांनी मिरज येथील प्रसिद्ध ग्रॅन्ट मेडिकल कॉलेज मिरज (जीएमसी मिरज) येथे डीन म्हणून चांगले काम केले आहे.
ऑगस्ट २०१९ मध्ये कोल्हापुर, सांगली जिल्ह्यात पावसाने थैमान घातल्यामुळे येथे आरोग्याबाबत अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पुर ओसरल्यानंतर निर्माण झालेल्या आरोग्य परिस्थितीकडे त्यांनी असामान्य धैर्य आणि व्यवस्थापन कौशल्य दाखविले. त्यांच्या सतर्कतेमुळे रोगराइला प्रतिबंध करणारी उपाययोजना राबविण्यात त्या आपल्या अधिकारी-कर्मचारी यांच्या मदतीने यशस्वी झाल्या होत्या. त्यामुळे जीएमसी मिरजने रुग्णसेवचे आणि आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण सादर करतानाच माणुसकी आणि सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडवत एक प्रकारचा आदर्श निर्माण केला. त्यामुळेच डॉ पल्लवी सापळे यांची या पुरस्कारासाठी निवड करताना सार्थ अभिमान वाटत असल्याचे अध्यक्ष किशोर शिरोडकर, कार्यवाह शाम पावसकर यांनी दिलेल्या प्रसिद्धि पत्रकात म्हटले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सेवांगण मालवण कार्याध्यक्ष दीपक भोगटे व कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी केले आहे.
फोटो ओळ:- डॉ पल्लवी सापळे