आवानओल प्रतिष्ठानचा पुरस्कार प्रा. नामदेव गवळी यांना जाहीर…

121
2

वैभववाडी/प्रतिनिधी.ता.०८: कणकवली येथील आवानओल प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या २०१९ सालच्या कविवर्य द. भा. धामणस्कर काव्य पुरस्कारासाठी सिंधुदुर्गातील मालवणी कवी प्रा. डॉ. नामदेव गवळी यांच्या लोकवाड:मय गृह मुंबई प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ‘भातालय’ काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. याच महिन्यात कणकवली येथे होणाऱ्या आवानओल प्रतिष्ठानच्या कविवर्य वसंत सावंत स्मृती दशवार्षिक उगवाई काव्य उत्सव सोहळ्यात प्रा.गवळी यांना सदर पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
आवानओल प्रतिष्ठानतर्फे मागील काही वर्षे मराठीतील एका चांगल्या कविला प्रोत्साहन देणे आणि त्याची काव्य गुणवत्ता चोखंदळ काव्य रसिकांसमोर आणणे या उद्देशाने कविवर्य द.भा. धामणस्कर यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येतो.यापूर्वी या पुरस्काराने कवी अविनाश गायकवाड, संदीप जगदाळे, बालाजी सुतार, नामदेव कोळी, फेलिक्स डिसोजा आदी कवींना गौरविण्यात आले.यावर्षी या पुरस्कारासाठी प्रा.गवळी यांच्या ‘भातालय’ काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे.
प्रा. गवळी हे वैभववाडी आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा ‘भातलय’ काव्यसंग्रह २०१८ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर या संग्रहाला मराठी वाचकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. ‘भातलय’ काव्यसंग्रहातील कवितांचा समावेश मुंबई विद्यापीठाच्या एसवाय बीएच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.यापूर्वी ‘भातालय’ संग्रहाला नामदेव ढसाळ, भि ग रोहमारे अशा अनेक काव्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. प्रा गवळी हे मालवणी बोलीतून लिहिणारे आजच्या पिढीतील महत्त्वाचे कवी असून त्यांच्या कवितेतून मालवणी मुलखातील लोकजीवनाची सशक्त परंपरा व्यक्त होतानाच आधुनिक जगण्याचे अंतर्विरोधही व्यक्त होतात.कविवर्य धामणस्कर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रा. गवळी यांचे कोकणच्या साहित्य चळवळीतून अभिनंदन होत आहे!

4