विविध घोषणांनी परिसर दुमदुमला;३५ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतला सहभाग…
ओरोस.ता.०८:‘एकच मिशन जुनी पेंशन’ ‘आमच्या मागण्या मान्य करा’ ‘हम सब एक है’ ‘लढके लेंगे हमारे हक’ अशा घोषणा देत जिल्ह्यातील सरकारी निमसरकारी कर्मचारी आणि कामगार संघटनांनी बुधवारी महाराष्ट्र राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. सरकारी कार्यालये, ग्रामसेवक तलाठी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा, बँक, पोस्ट, शिक्षक आधी सर्वच संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. यावेळी शेकडोंच्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते. अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्याकडे २४ मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामगार व कर्मचारी संघटना देशव्यापी संपात सहभागी झाल्या असून या समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली आज ओरोस श्री देव रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला. यात विविध ३५संघटना सहभागी झाल्या होत्या.
मोर्चाच्या सुरुवातीला ओरोस श्री देव रवळनाथ मंदिर येथील सभागृहात सर्व संघटनांचे सदस्य जमा झाले होते. यावेळी उपस्थितांना आपण हा संप का करत आहोत. मोर्चा का आवश्यक आहे. शासकीय धोरणे चुकीची असून त्याचे दुष्परिणाम काय आहेत या बाबत संघटनांच्या प्रतिनिधीनी मार्गदर्शन केले. यात राज्य चतुर्थ श्रेणी सरकारी कर्मचारी संघटनेचे एस एल सपकाळ, राजन वालावलकर, प्राथमिक शिक्षक समितीचे चंद्रकांत अणावकर, राजन कोरगावकर, नंदकुमार राणे, प्राथमिक शिक्षक संघाचे म ल देसाई, कमल परुळेकर, संजय पवार, ग्राम सेवक संघटना जिल्हाध्यक्ष संतोष गावडे, गुरुनाथ पेडणेकर, विनयश्री पेडणेकर, संजय पवार, विजय भोगले, किशोर कदम, राजेश चव्हाण, संतोष पाताडे, के टी चव्हाण, शाम लाखे, नंदकुमार राणे, राजन कोरागांवकर, चंद्रसेन पाताडे, वाय. एस आरोसकर आदींचा सहभाग होता. दुपारी १२: २५ ला मोर्चाला सुरुवात झाली हा मोर्चा १:१५ च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.