बांदा येथिल गोगटे-वाळके महाविद्यालयात चर्चासत्राचे आयोजन…

2

डी.बी.वारंग;खासदार विनायक राऊत यांची प्रमुख उपस्थिती…

बांदा.ता,०८:
शिक्षण प्रसारक मंडळ बांदा संचलित येथील गोगटे-वाळके महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाविद्यालयात शनिवार दिनांक ११ रोजी संघराज्यीय रचनेचे सामाजिक व आर्थिक महत्व या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे उद्घाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डी बी वारंग यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
महाविद्यालयाच्या सामाजिक शास्त्रे व वाणिज्य विभाग यांच्यावतीने शिबीर होणार आहे. या चर्चासत्राचे बीजभाषण ज्येष्ठ सामाजिक, राजकीय अभ्यासक, संशोधक, विश्लेषक अजित अभ्यंकर करणार आहेत.
स्वातंत्र्यापूर्वी भारतात सुमारे ६०० हुन अधिक संस्थाने होती. स्वातंत्र्यानंतरच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समितीने शिफारस केल्याप्रमाणे भारतामध्ये संघराज्यीय रचना निर्माण झाली. त्यामधून आतापर्यंत समान संस्कृती, भाषा, भौगोलिक सलगता आणि १९५६ च्या भाषावार प्रांतरचनेच्या आधारे आजची २८ राज्ये स्थापन झाली आहेत. २०२० मध्ये भारतीय प्रजासत्ताकला ७० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे या संघराज्यीय व्यवस्थेतील राज्यांच्या कामगिरीचा चिकित्सक आढावा घ्यावा, विश्लेषण करावे, सारासार चर्चा व्हावी या उद्देशाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असल्याचे वारंग यांनी सांगितले. या संशोधनात्मक असणाऱ्या विषयावर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ यासह विविध राज्यातील विषयतज्ञ, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी विचारमंथन करणार आहेत. अनेक संशोधक आपले शोधनिबंध सादर करणार आहेत. हे चर्चासत्र पाच सत्रात होणार आहे.
यावेळी संस्थेचे सचिव एस. आर. सावंत, खजिनदार तुकाराम शेटकर, सुभाष मोर्ये, धोंडू फणशिकर, भगवान देसाई, प्राचार्य डॉ. श्रीकांत सावंत आदी उपस्थित होते. शिक्षणप्रेमींनी चर्चासत्रात सहभागी होण्याचे आवाहन समन्वयक प्रा. डॉ. एम. एन. वालावलकर यांनी केले आहे.

3

4