“त्या” निर्णया विरोधात नगरविकास कोकण विभागीय संचालकांकडे अपील…
वेंगुर्ले.ता.८:
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ६५ (४) ब अन्वये वेंगुर्ला नगरपरिषद विषय समिती सभापती निवडणुकीमध्ये पीठासन अधिकारी तथा जिल्हा नगर विकास अधिकारी संतोष जीरगे यानी दिलेल्या निर्णया विरोधात नगरपरिषद प्रशासन कोकण विभागाचे प्रादेशिक संचालक याच्याकडे अपिल दाखल करण्यात आले आहे. हे अपिल विषय समिती सभापती पदाचे उमेदवार प्रशात आपटे, श्रेया मयेकर व सतारुढ पक्षाचे गट नेते सुहास गवंडळकर यांनी दाखल केले आहे.
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या विषय समिती सभापती पदासाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांवर सुचक व अनुमोदक म्हणून त्या त्या समितीतील सदस्यांची नावे नसल्याने निवडणुक नियम २००६ प्रमाणे दाखल झालेले अर्ज पीठासन अधिकारी तथा जिल्हा प्रशासन नगर विकास अधिकारी जीरगे यांनी नामंजुर केले होते. कोणताहि अर्ज वैद्य न ठरल्याने वेंगुर्ला विषय समिती सभापती पदाची निवडणुक रद्द झाली होती. त्या विरोधात ८ जानेवारी रोजी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या विषय समिती सभापती पदाचे उमेदवार प्रशात आपटे, श्रेया मयेकर व गट नेते सुहास गवंडळकर यांनी प्रादेशिक संचालक नगरपरिषद प्रशासन कोकण विभाग यांच्याकडे अपिल दाखल केले आहे.
पिठासन अधिकारी यांनी दिलेला निर्णय हा पूर्णपणे बेकायदेशीर व कायद्याच्या तरतुदीचा चुकीचा अवार्थ काढुन दिलेला आहे. त्यामुळे आमचे अपिल मान्य करुन दाखल करण्यात आलेली नामनिर्देशन पत्र वैद्य आहेत असे घोषीत करावे व नामनिदेशन पत्रे अवैद्य ठरविल्यामुळे रद्द झालेली निवडणुक परत घेण्याचा आदेश व्हावा अशी मागणी या अपिलात करण्यात आली आहे. या अपिलावर पुढे काय निर्णय लागतो या कडे वेंगुर्ले वासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.