वेगुर्ले-दाभोली ग्रामस्थांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे इशारा…
वेगुर्ले ता.०८: दाभोली येथे घडलेल्या खून प्रकरणात संशयित असलेले ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील यांचे सदस्य पद रद्द करण्याची कारवाई येत्या आठ दिवसात करण्यात यावी,अन्यथा २६ जानेवारीला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर उपोषण करू,असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.याबाबत आज ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की,वेंगुर्ले तालुक्यात घडलेल्या भानुदास मौर्जे खून प्रकरणात संशयित आरोपी म्हणून संदीप पाटील यांचे नाव होते.या प्रकरणात झालेल्या चौकशीनंतर सुमारे चार महिने ते जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते.सद्यस्थितीत ते जामिनावर मुक्त आहे.न्यायालयीन कोठडीत असताना त्यांचे सदस्य पद रद्द करणे आवश्यक होते.परंतु ग्रामविकास अधिकारी गटविकास अधिकारी यांच्याकडून आवश्यक ती कारवाई झालेली नाही.त्यामुळे याबाबत तात्काळ संबंधितांवर कारवाई होणे अपेक्षित आहे.येत्या आठ दिवसात यावर योग्य तो निर्णय प्रशासनाने घ्यावा,अन्यथा २६ जानेवारी ला उपोषण करू,असा इशारा या निवेदनातुन ग्रामस्थांनी दिला आहे.
या निवेदनावर दाभोली सरपंच उदय गोवेकर,ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण बांदवलकर,माजी पंचायत समिती सदस्य समाधान बांदवलकर, माजी ग्रामपंचायत सदस्य नरेश बोवलेकर,माजी उपसरपंच एकनाथ राऊळ, तंटामुक्त गाव समिती सदस्य दादा सारंग,सुदाम मोर्जे,विवेक परब आदीच्या सह्या आहेत.