‘ग्रामीण विकासाच्या दिशा‘ यावर विशेष संवादाचे आयोजन…
वेंगुर्ले. ता,०९: श्रीधर मराठे स्मृती ‘जागर विचारांचा‘ या कार्यक्रमांतर्गत शनिवार दि. ११ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता बॅ.खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला येथे ‘ग्रामीण विकासाच्या दिशा‘ या विषयावर विशेष संवादाचे आयोजन केले आहे. जनसेवा निधी बांदा यांचा आदर्श माध्यमिक शिक्षक पुरस्कार प्राप्त, भगिरथ प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तथा माड्याची वाडी येथील हायस्कूलमध्ये गेली २७ वर्षे अध्यापनाचे काम करणारे अनंत मधुसूदन सामंत हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
वेंगुर्ला येथील किरात ट्रस्ट हे गेली ६ वर्षे साप्ताहिक किरातच्या वर्धापन वर्षानिमित्त श्राीधर मराठे स्मृती ‘जागर विचारांचा‘ या कार्यक्रमांतर्गत विविध सामाजिक विषयांवर प्रबोधन करणारी व्याख्याने तसेव परिसंवादाचे आयोजन करीत आहेत. यावर्षी ‘ग्रामीण विकासाच्या दिशा‘ या विषयावर विशेष संवादाचे आयोजन केले आहे. आज आपल्या आजूबाजूला घडणा-या घटनांचा विचार करता विकास कामांच्या तुलनेत रोजगाराच्या संधी खरचं निर्माण होताहेत का? पारंपरिक पदवीबरोबर कौशल्यावर आधारीत व्यवसायाभिमूख शिक्षण उपलब्ध आहे का? या विषयांवर मधुसूदन सामंत हे मार्गदर्शन करणार आहेत. याच कार्यक्रमात ‘विकासाचा मानवी चेहरा‘ या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे. तसेच कचऱ्याच्या वैश्विक समस्येवर ‘कृषीऋषी‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी बनविलेल्या ‘जीवामृता‘चा प्रचार व प्रसार करणारे वेंगुर्ल्याचे सुपुत्र अजित परब यांचा विशेष सत्कारही केला जाणार आहे. या कार्यक्रमाला बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देऊलकर, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उद्योजक रघुवीर मंत्री आदी उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन साप्ताहिक किरात व किरात ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.