सदस्यांची नाराजी;सर्व निधी खर्च करण्याच्या फर्नाडीस यांच्या सूचना…
सिंधुदुर्गनगरी.ता,०९:
जिल्हा परिषद मधील विविध विभागांचा नोव्हेंबर अखेर केवळ १७ टक्के निधी खर्च झाल्याची बाब आज पार पडलेल्या वित्त समिती सभेत उघड झाली. जिल्हा परिषद बजेट च्या २१ कोटी ४९ लाख पैकी ३ कोटी ७३ लाख खर्च झाला आहे. निधी खर्चाच्या आकडेवारीवरून सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मार्च महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे प्रत्येक विभागाने मार्च पूर्वी आपपल्या विभागांचा १०० टक्के निधी खर्च करा अशा सूचना सभापती जेरोन फर्नांडिस यांनी दिल्या.
जिल्हा परिषद वित्त समितीची मासिक सभा सभापती जेरोन फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा वित्त व लेखाधिकारी विशाल पवार, सदस्य संतोष साटविलकर, महेंद्र चव्हाण, गणेश राणे, रविंद्र जठार, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध नसलेल्या रुग्णवाहिकेचा प्रश्न चर्चेला आला. जिल्ह्यातील ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी ३६ आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध आहे. तर उर्वरित २ केंद्रांमध्ये रुग्णवाहिका नाही. काही ठिकाणी रुग्णवाहिका नादुरुस्त आहे, अशी माहिती आरोग्य विभागा कडून देण्यात आली.
२०१९-२० आर्थिक वर्षासाठी २१ कोटी ४९ लाख एवढे जिल्हा परिषदसाठी बजेट मंजूर आहे. या निधीचे जिल्हा परिषदच्या १७ विभागांना वाटप करण्यात आले. आज संपन्न झालेल्या सभेत निधी खर्चाचा आढावा घेण्यात आला. वित्त विभागाने हा आढावा सभागृहात सादर केला. त्यानुसार ३ कोटी ७३ लाख रुपये खर्च झाला आहे. निधी खर्चाची आकडेवारी नोव्हेंम्बर अखेर पर्यंतची आहे. १७ टक्के निधी खर्च आहे. निधी खर्चाचे वाचन सभागृहात नंतर सर्व समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. मार्च महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. असे असतांना जिल्हा परिषद बजेट चा झालेला खर्च समाधानकारक नाही. यातील निधी अखर्चित राहिल्यास पुढील येणाऱ्या फंडावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हा अखर्चित निधी मार्च अखेर पर्यंत खर्च अशा सूचना सभापती जेरोन फर्नांडीस यांनी दिल्या.
बॉक्स…पेयजल योजनेचे नामकरण
केंद्र शासनाने राष्ट्रीय पेयजल योजनेचे नाव बदलून जलजीवन अभियान करण्यात आले आहे. याची माहिती सभागृहात देण्यात आली. योजनेचे नाव बदलले असले तरी यातील योजना जलजीवन अभियान मध्ये समाविष्ठ करा अशा सूचना देण्यात आल्या.