रविकिरण तोरसकर ; मच्छीमारांनी मोठ्या संघर्षासाठी तयार राहावे…
मालवण, ता. ९ : पर्ससीन, एलईडी लाईट मासेमारीचे खंदे समर्थक असलेल्या कॅबीनेट मंत्री उदय सामंत यांना सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मत्स्यदुष्काळाच्या समस्येत होरपळलेल्या मच्छीमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे अशी टीका नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे सदस्य रविकिरण तोरसकर यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
पारंपरिक मच्छीमार, सागरी जैवविविधता शाश्वत राहण्यापेक्षा मत्स्यव्यवसायातील ’अर्थकारणात’ नवनियुक्त पालकमंत्री उदय सामंत यांना जास्त रस आहे. त्यांच्या या जाहीर भूमिकेमुळे आधीच मत्स्यदुष्काळात होरपळणार्या मच्छीमाराला ‘बुरे दिन’ आल्याशिवाय राहणार नाही. पालकमंत्री उदय सामंत यांच्या भूमिकेवर सिंधुदुर्गातील त्यांच्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात याकडे मच्छीमार संघटनांचे लक्ष लागून राहिले आहे. नवनियुक्त पालकमंत्री यांनी एलईडी मासेमारी बद्दल जी भूमिका रत्नागिरीत घेतली तीच भूमिका यापुढे घेतल्यास रत्नागिरी-सिंधुदुर्गातील जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमार संघटितपणे त्याला सडेतोड उत्तर देतील यात वाद नाही.
एलईडी-पर्ससीन समर्थक उदय सामंत यांची सिंधुदुर्गच्या पालकमंत्री म्हणून केलेली नियुक्ती म्हणजे छोट्या मच्छीमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. पालकमंत्र्यांच्या भूमिकेमुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील मच्छीमारांनी मोठ्या संघर्षासाठी तयार राहावे असे आवाहनही श्री. तोरसकर यांनी केले आहे.