सुदैवाने जीवित हानी टळली : शिरोडा येथील रिक्षेचे मोठे नुकसान….
वेंगुर्ले,ता.१०:वेंगुर्ले उभादांडा येथील मानसीश्वर पेट्रोल पंप वर पेट्रोल भरून बाहेर पडणाऱ्या शिरोडा येथील रिक्षावर पंपाच्या बाजूला असलेले भल्यामोठ्या आंब्याच्या झाडाची मोठी फांदी तुटून पडल्याने रिक्षाचा चेंदामेंदा झाला आहे. दैव बलवत्तर म्हणून जीवित हानी टळली. मात्र रीक्षेचे मोठे नुकसान झाले आहे.
सोन्सुरे येथील कृष्णा गडेकर हे आपली एम.एच.०७ एस.५१२० या रिक्षाने चिपकर यांचे भाडे घेऊन सकाळी वेंगुर्ले येथे डॉक्टर कडे आले होते. तपासणी झाल्यावर गडेकर चिपकर यांना घेऊन वेंगुर्ले तून शिरोडा येथे निघाले होते. मानसीश्वर पंपाजवळ आल्यावर गडेकर यांनी पेट्रोल भरण्यासाठी रिक्षा पंपावर नेली. पेट्रोल भरून रिक्षा बाहेर काढणार एवढ्यातच पंपाशेजारी असलेल्या झाडाची मोठी फांदी तुटून थेट रिक्षेवर पडली. या अपघातात रीक्षेचा पुढील भाग पूर्णता तुटून चेंदामेंदा झाला आहे. सुदैवाने गडेकर बाजूला सरकल्याने जीवित हानी टळली. रिक्षामध्ये मागे बसलेले चीपकर यांच्या पायाला थोडी दुखापत झाली आहे. त्यांना दवाखान्यात नेऊन उपचार करण्यात आले.
दरम्यान पंपावर बाजूला उभ्या असलेल्या दोन मोटर सायकलवरही ही फांदी पडल्यामुळे त्या मोटरसायकलचे ही नुकसान झाले आहे.