तिलारीला “अभयारण्य” म्हणून घोषित करा..

108
2

प्राणी प्रेमींची मागणी:सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाघांचा अधिवासाच्या पाउलखुणा…

दोडामार्ग. ता,१०: येथील गोव्यामधील म्हादई अभयारण्यात झालेल्या चार वाघांच्या मृत्यूनंतर पश्चिम घाटातील व्याघ्र संवर्धनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महत्त्वाचे म्हणजे यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाघांचा अधिवास असणाऱ्या तिलारी परिसराला ‘अभयारण्य’ म्हणून घोषित करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. म्हादई अभयारण्य, मांगेली आणि तिलारी या पट्ट्यात वाघांचे अधिवास क्षेत्र आहे. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाशी जोडणाऱ्या या पट्ट्याला संरक्षित क्षेत्राचा दर्जा देणे.आवश्यक असल्याचे मत वन्यजीव संशोधक व पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे. गेल्यावर्षी प्रसिद्ध झालेल्या व्याघ्र गणनेच्या चौथ्या अंदाजपत्रकामधून गोव्यात चार वाघांचा अधिवास असल्याचे समोर आले होते. मात्र, गेल्या आठवड्याभरात गोवा वनविभागाला म्हादई अभयारण्यातील गोळावली परिसरात चार वाघांचे कुजलेले मृतदेह आढळले.
यामध्ये वाघीण आणि तिच्या तीन बछड्यांचा समावेश आहे. शेतकऱ्याने गुरांच्या मृत शरीरातून विष दिल्याने या वाघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, यामधील एका वाघाची नखे गहाळ झाली आहेत. त्यामुळे वाघांच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण आहे. म्हादई अभयारण्याचे वनक्षेत्र महाराष्ट्रातील मांगेली आणि तिलारीला जोडते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ते म्हादई अभयारण्यादरम्यान असलेला.
हा परिसर बऱ्याच कालावधीपासून संरक्षणाच्या प्रतिक्षेत आहे. तिलारी आणि मांगेली परिसरात वाघांचा अधिवास असल्याचे सिद्ध झाले आहे. असे असूनही केवळ राजकीय आणि या परिसरात बस्तान बांधलेल्या परप्रांतीय भू-माफियांच्या दबावापोटी वनविभाग तिलारी अभयारण्य घोषित करण्यासाठी दिरंगाई करत असल्याचा आरोप वन्यजीव निरीक्षक आणि पर्यावरणप्रेमी काका भिसे यांनी केला आहे.

4