सावंतवाडी नाथ पै सभागृहा समोरील मार्गावर एकेरी वाहतूक सुरु करणार…

संजू परब; शहरातील २४ स्वच्छतागृहा पैकी ६ स्वच्छतागृहांचे “बेस्ट टॉयलेट” मध्ये रूपांतर…

सावंतवाडी ता.१०: येथील नाथ पै सभागृहाच्या मुख्य दरवाज्यासमोरून बाजारपेठेत जाणाऱ्या १०० मीटर रस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरू केली जाणार आहे.त्याचबरोबर त्या ठिकाणी पे पार्किंग सुरू केले जाणार आहे,अशी माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली.दरम्यान शहरातील २४ स्वच्छतागृहां पैकी सहा स्वच्छतागृहांचे रूपांतर “बेस्ट टॉयलेट” मध्ये केले जाणार आहे.व इतर स्वच्छतागृह सुस्थित केले जाणार आहेत.असेही त्यांनी यावेळी सांगितले.आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले,शहरात ठीक-ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे.त्यात नाथ पै सभागृह समोरून जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे.त्यासाठी त्या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू करण्या बरोबर त्या ठिकाणी पे पार्किंग सुरू केले जाणार आहे.त्याच बरोबर येथील मिलग्रीस स्कूल परिसरात शाळा सुटल्यानंतर होणारी वाहतूक कोंडी थांबविण्यासाठी वाहतूक पोलीस ठेवण्यात येणार आहेत.त्यासाठी सावंतवाडी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांना मी निवेदन दिले आहे आणि लवकरात लवकर या सर्व कारवाया पूर्ण केल्या जाणार आहेत.असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले,शहरातील २४ स्वच्छतागृहा पैकी सहा स्वच्छतागृहांचा समावेश बेस्ट टॉयलेटमध्ये केला जाणार आहे .यात रघुनाथ मार्केट,निंबाळकर पीर, भाजी मार्केट ,सबनिसवाडा आणि वैश्यवाडा आदी परिसरातील स्वच्छतागृहांचा समावेश आहे.तर इतर १८ स्वच्छतागृह सुस्थित केले जाणार असून त्यामध्ये नेहमी स्वच्छता राखली जाणार आहे.मात्र या सुविधा राबविल्यानंतर त्यात नागरिकांना काही बाधा आढळल्यास नागरिक आपला तक्रार अर्ज नगरपालिकेत देऊ शकतात,असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

4