वेंगुर्ले- नगरवाचनालय पर्यंत जाणाऱ्या गटारातील दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त…

2

उपाययोजना न झाल्यास २६ जानेवारीला उपोषण : नागरिकांचा न. प.प्रशासनाला इशारा…

वेंगुर्ले.ता.१०: वेंगुर्ले- गाडीअड्डा ते नगरवाचनालय पर्यंत जाणारा पावसाळी गटार (व्हाळी) आहे. या गटारात सांडपाणी, सुलभ शौचालयांचे सांडपाणी, मच्छी मार्केट मधील दुर्गंधीयुक्त सांडपाणी सोडले जात आहे. परिणामी या भागात राहणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यावर तात्काळ उपाययोजना न झाल्यास २६ जानेवारी रोजी आम्ही सामूहिक उपोषणास बसणार असा इशारा या भागातील नागरिकांनी आज नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. दरम्यान सदर विषयाची आम्हाला कल्पना असून गटारातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. या कामाची टेंडर प्रक्रिया सुरू असून लवकरच काम सुरू होईल अशी माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप व मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी नागरिकांना दिली.
शहरातील चर्मकारवाडी व कुबलवाडी येथील या गटारा लगत असणाऱ्या लगतच्या घरातील नागरिकांना या गतरातील दूषित पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. गेली काही वर्षे नागरिक या प्रश्नाबाबत पाठपुरावा करीत आहेत. दोन वर्षांपूर्वी नागरिकांनी २६ जानेवारी २०१८ रोजी उपोषण केले होते. मात्र अद्यापही न.प.प्रशासनाने ठोस उपाय योजना केली नाही. परिसरातील सर्व इमारती मधील सांडपाणी या गटारामधून जात आहे. त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी आज नंदन वेंगुर्लेकर, विवेक कुबल, सुनील डूबळे, वैभवी गावडे, राजन केरकर, सविता गावडे, किशोरी दिपनाईक, खिमजी भानुषाली, श्री भाटिया, हेमंत कोळसुलकर, यांच्यासह नागरिकांनी एकत्र येत वेंगुर्ले येथे कार्यक्रमा निमित्त आलेल्या आमदार दीपक केसरकर यांना घटनास्थळी नेऊन वस्तुस्थिती दाखवली.
त्या नंतर या नागरिकांनी नगरपालिकेत धाव घेऊन मुख्याधिकारी श्री साबळे व नगराध्यक्ष दिलीप गिरप यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. आम्ही सर्व नागरिक सध्या नाक दाबून राहत आहोत. येथील शाळेतील विद्यार्थ्यांनाही दुर्गंधी सहन करत शिकावे लागत आहे. त्यामुळे यावर तात्काळ उपाय योजना करा अन्यथा आम्ही २६ जानेवारी २०२० रोजी या प्रश्नावर सामूहिक उपोषण करणार असा इशारा या नागरिकांनी दिला आहे.
*लवकरच करणार कामाला प्रारंभ : नगराध्यक्ष गीरप*
गाडी अड्डा ते नगर वाचनालय पर्यंत जाणाऱ्या गटारातील दुर्गंधीच्या विषयासंदर्भात न प मध्ये आलेल्या नागरिकांबरोबर बोलताना नगराध्यक्ष श्री. गिरप म्हणाले की हे सांडपाणी वाहून नेण्यासाठी स्वतंत्र पाईप लाईन टाकण्यात येणार आहे. त्यामुळे दुर्गंधीचा प्रश्न मिटणार आहे. न. प. मधील सर्व नगरसेवक या कामाचा पाठपुरावा सुरुवातीपासून करत आहेत. कामाचे अंदाजपत्रक मंजूर झाल्यानंतर लवकरच हे काम सुरू करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. तर मुख्याधिकारी श्री. साबळे म्हणाले की, वेंगुर्ले नगर परिषद सदर कामाच्या पूर्ततेसाठी सुरुवातीपासूनच पाठपुरावा करत आहे. मात्र या कामासाठी विशेष निधीची तर्तृत नव्हती त्यामुळे काम झाले नाही. म्हणून मागील बजेटमध्ये या कामासाठी निधीची तरतूद केली आहे. तसेच मुंबई येथील नामांकित साई कंपनीला या कामाचे अंदाजपत्रक बनवण्यासाठी सांगितले होते. अंदाजपत्रक तयार झाले असून नगराध्यक्षांनी १४ जानेवारी रोजी ठेवलेल्या विशेष सभेत या कामाला मंजुरी देऊन लवकरच हे काम सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी दिली.

4