आत्महत्येचे कारण अस्पष्ट ; पोलिस तपास सुरू…
मालवण, ता. १० : मालवण तालुक्यात दोन ठिकाणी वृद्ध व तरूणाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यात बेपत्ता असलेल्या वेरळ येथील अशोक गणपत परब (वय-५५) यांनी जंगलमय भागात तर हडी साळकरवाडी येथील रामचंद्र देऊ भोजने (वय-३५) या तरुणाने घरामागील मांगरात गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.
वेरळ थळकरवाडी येथील दत्ताराम परब हे आज सकाळी गुरे चारण्यास माळरानावर गेले होते. त्यानंतर गुरांना पाणी देत असताना त्यांना उंचवळा मळा येथे घाण वास आल्याने ते त्या दिशेने गेले असता एका व्यक्तीने जंगली झाडास नॉयलॉन दोरीने गळफास लावला असल्याचे दिसून आले. त्यांनी जवळ जावून पाहिले असता हा मृतदेह गावातीलच अशोक गणपत परब यांचा असल्याचे दिसून आले. त्यांनी या प्रकाराची माहिती पोलिस पाटील प्रमोद परब यांना दिली. त्यांनी याची माहिती मसुरे पोलिस दूरक्षेत्रास दिली. पोलिस कर्मचारी प्रमोद नाईक, विवेक फरांदे यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. अशोक परब हे ९ तारखेपासून बेपत्ता होते. याबाबतची खबर त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात दिली होती. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
हडी साळकरवाडी येथील रामचंद्र देऊ भोजने (वय-३५) या तरूणाने घरामागील मांगरात ओढणीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचा प्रकार आज दुपारी साडे तीन वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आला. याबाबतची माहिती किशोर नरे यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली. या प्रकाराची माहिती मिळताच सरपंच महेश मांजरेकर यांच्यासह अन्य स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस कर्मचारी हेमंत पेडणेकर, संतोष गलोले यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. मात्र आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. अधिक तपास पोलिस करत आहेत.