पणजी
दोन वर्षापूर्वी चलनातून काढून टाकलेल्या तब्बल १.४८ कोटीच्या जुन्या एक हजाराच्या नोटा गोव्यात वठविण्यासाठी आलेल्या कासरगोड-केरळ येथील पाचजणांना गुरुवारी रात्री काणकोण येथील पोळे पोलीस तपासणी नाक्यावर अटक करण्यात आली. एका स्विफ्ट कारमधून हे पाचहीजण गोव्यात आले होते.
काणकोण पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, अटक केलेल्यांची नावे अब्दुल कादर (वय ४४), बी सलीम (वय ३३), रझाक मेहमद (वय ४५), अबुबकर सिद्दीकी (वय ३२) व बी. युसूफ (वय ३२) अशी असून सध्या ते काणकोण पोलिसांच्या ताब्यात आहेत. या संशयितांच्या मालकिची केएल १४ यू ३३३० या क्रमांकाची स्विफ्ट गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे.
दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, गोव्यात जुन्या नोटा विकत घेतात अशी माहिती मिळाल्यामुळे हे पाचहीजण त्या वठविण्यासाठी गोव्यात आले होते. मात्र त्यांना गोव्यात त्यासाठी ग्राहक न मिळाल्याने या नोटा घेऊन परत जाताना त्यांना पोळेच्या तपासणी नाक्यावर तपासणीसाठी थांबविण्यात आले. रात्रीच्या गस्तीवर असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमाकांत वेळीप यांनी या संशयितांना अटक केली. काणकोणचे उपनिरीक्षक रामचंद्र नाईक हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.