समुद्रात बुडणाऱ्या दोन रशियन पर्यटकांना वाचविण्यात जीव रक्षकांना यश…

2

रेडी येथील घटना; पिता-पुत्राचा समावेश, अनर्थ टळला…

वेंगुर्ले ता.१०: तालुक्यातील रेडी यशवंत गड समुद्रकिनारी पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या रशियन पर्यटक पिता-पुत्राला पाण्यात बुडताना पाहून येथील जीव रक्षकांनी आपला जीव धोक्यात घालून त्या दोघांना वाचविले.त्यामुळे रेडी गावात जीव रक्षकांच्या कामाचे कौतुक होत आहे.
गोवा येथून पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी हे रशियन पर्यटक सिंधुदुर्गात आले होते. आज दिनांक १० जानेवारी रोजी दुपारी १२:३५ वाजण्याच्या सुमारास फिरत फिरत हे दोघे पर्यटक रेडी यशवंत गड समुद्र किनारी पोहचले. येथील निळाशार समुद्र किनारा आणि समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटा पाहून त्यांना पाण्यात उतरून पोहण्याचा मोह आवरता आला नाही. त्यामुळे दोघेही रशियन पर्यटक अॅलेक्स (वय ४२) व त्यांचा मुलगा सॅन (वय १३) समुद्राच्या पाण्यात उतरले. पोहताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल समुद्रात बुडायला लागले. ते बुडत असल्याचे किनाऱ्यावर असलेल्या
रेडी येथील जीवरक्षक संजय गोसावी व दिलीप रुद्रे यांनी पाहिले, आणि त्याक्षणी आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्यात रिंग बोया घेऊन उतरून त्या दोघा पिता पुत्राला सुरक्षित रित्या वाचवून किनाऱ्यावर आणले.
रेडी समुद्र किनारा असो किवा शिरोडा समुद्र किनारा येथील जीवरक्षक आपल्या जीवाची पर्वा न करता देशी आणि विदेशी पर्यटकांना समुद्रात बुडताना वाचवत आहेत. अशा धाडसी जीव रक्षकांच्या पाठीवर आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच जिल्हा पोलीस प्रशासन यांनीही शाब्बासकीची थाप देणे गरजेचे आहे. तरच अशा जीव रक्षकांना आपल्या कामामध्ये आणखी स्फूर्ती मिळेल रेडी येथील या दोन्ही जीव रक्षकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

4