वेंगुर्लेत गुरुवार १६ जानेवारीला आयोजन…
वेंगुर्ले,ता.११:वेंगुर्ले नगरपरिषद नगराध्यक्ष चषक सिंधुदुर्ग जिल्ह्याची कुमार व कुमारी गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा गुरुवार १६ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता वेंगुर्ला कॅम्प मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या वतीने व वेंगुर्ला नगर परिषद यांच्या सहकार्याने व वेंगुर्ला तालुका कबड्डी असोसिएशनच्या आयोजनाखाली ही स्पर्धा होत आहे.या अनुषंगाने प्रत्येक तालुका कबड्डी असोसिएशने आप-आपल्या तालुक्याचे कुमार गट (boys) प्रत्येकी दोन संघ व कुमारी गट(Girls) संघ प्रत्येकी एक संघ दिनांक १५ जानेवारी पूर्वी तयार ठेवायचे आहे. प्रत्येक तालुक्याला जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी जो प्रवेश अर्ज दिला आहे, त्या प्रवेश अर्जावर खेळाडूचे नाव, जन्मतारीख, संघातील स्थान वजन व इतर आवश्यक बाबींची माहिती लिहून संघटनेच्या सही शिक्यासह दिनांक १५ जानेवारी पर्यंत जिल्हा सहकार्यवाह श्री तुषार साळगावकर यांच्याकडे स्पर्धा प्रवेश वर्गणी (संघ नोंदणी )रुपये दोनशे व खेळाडू नोंदणी प्रत्येकी पन्नास रुपये जमा करावी व सोबत खेळाडू कागदपत्रांची फाईल फोटो सहित जमा करावी. तालुका कबड्डी असोसिएशन ने आपल्या तालुक्यातील संघ पाठवताना त्या खेळाडूचे वजन व त्याची कागदपत्रे पूर्ण तपासूनच आपला संघ जिल्हा चाचणी करिता पाठवायचा आहे .खेळाडू ची जन्मतारीख २९ फेब्रुवारी २००० नंतर ची असावी तसेच कुमार खेळाडू चे वजन ७० किलोच्या आत व कुमारी खेळाडूचे वजन ६५ किलोच्या आत मध्ये असणे आवश्यक आहे. प्रत्येक खेळाडूचे आधार कार्ड व दोन पासपोर्ट फोटो सोबत आणावेत. स्पर्धेकरिता पाठविण्यात येणाऱ्या संघातील खेळाडूंचा गणवेश एक सारखा असावा यासाठी तालुका कबड्डी असोसिएशनने विशेष लक्ष द्यावा. खेळाडूंची भोजन व्यवस्था विनामूल्य करण्यात आली असून प्रत्येक तालुक्याने आपले संघ दिनांक १६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत उपस्थित ठेवावयाचे आहे. खेळाडूंची छाननी व कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर खेळाडूंना भोजन दिले जाणार आहे व दुपारी दोन वाजता स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. मातीची दोन क्रीडांगणे बनविली असून प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे .कुमार व कुमारी जिल्हा संघासाठी ज्या खेळाडूंची निवड होईल त्या खेळाडूने राज्य कबड्डी असोसिएशनच्या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. निवड झालेले कुमार व कुमारी गट संघ राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तसेच वर्षभरात होणाऱ्या जिल्ह्यातील कुमार व कुमारी गट निमंत्रित कबड्डी स्पर्धांसाठी या संघांना खेळविण्यात येणार आहे . या कुमार कुमारी गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत विजेत्या व उपविजेत्या संघाना आकर्षक नगराध्यक्ष चषक व स्पर्धेतील वैयक्तिक बक्षिसे मिळविणाऱ्या खेळाडूंना आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी कार्यवाह श्री तुषार साळगावकर ९४०४५१२३८४ व स्पर्धा समिती सदस्य श्री हेमंत गावडे ९४२१२३५१२८ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले आहे.