राणेंचा वारू रोखण्याचे, उदय सामंतांपुढे आव्हान…

2

राजकीय समीकरणे बदलणार;केसरकरांच्या भूमिकेकडेही जिल्हावासीयांचे लक्ष…

सावंतवाडी/अमोल टेंबकर,ता.१२:माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा जिल्ह्यातील वारू रोखण्यासाठी शिवसेनेकडून उदय सामंत यांना पालकमंत्री पद देत शिवसेनेने अनोखी खेळी खेळली आहे. त्यामुळे गेली सहा ते सात वर्षे राणे विरुद्ध केसरकर यांच्यात रंगलेला संघर्ष आता नव्या रूपात पाहायला मिळणार असून आता सामंत विरुद्ध राणे असा नवा सामना जिल्ह्यात रंगण्याचे चित्र आहे.
दुसरीकडे इतके दिवस जिल्ह्यात राहून राजकीय दृष्ट्या संघटना वाढविण्यासाठी अपयशी ठरल्याचा आरोप माजी पालकमंत्री केसरकर यांच्यावर केला जात असुन त्यांना मंत्री पदापासून शिवसेनेने डावलले. त्यामुळे या नव्या संघर्षात केसरकरांची नेमकी भूमिका काय असेल. केसरकर कोणता निर्णय घेतात हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
दहशतवाद आणि राणे यांची आक्रमकता या मुद्द्यावर केसरकर यांनी एकेकाळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना एक दोन नव्हे तर तब्बल सात वर्षे राजकारणात झुंझवले. त्यामुळे मागच्या वेळी झालेल्या लोकसभेसह विधानसभा निवडणूक राणे यांना पराभवाचे धक्के बसले. तसेच दुसरीकडे आपला स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करत राणेंनी सत्ता नसतानाही जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पोट निवडणुकीत, सरपंच, नगराध्यक्ष निवडणुकीत घवघवीत यश मिळवीत गतवैभव प्राप्त करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. सध्या विरोधात असले तरी राणे विद्यमान खासदार आहेत तर त्यांचे पुत्र नीतेश राणे आमदार आहेत नुकत्याच झालेल्या आंब्रड, बांदा व सावंतवाडी निवडणुकीत भाजपला यश मिळवून देत त्यांनी केसरकरांना मोठा धक्का दिला आहे. या सर्व घडामोडी लक्षात घेता पुन्हा एकदा नारायण राणे व त्यांची टीम जिल्ह्यात बलशाली होताना दिसते. यात त्यांना चांगली टक्कर देणारे केसरकर मात्र राजकारणात मंत्रीपद नसल्यामुळे काहीसे मागे पडल्याचे दिसून येत आहे. त्यांना नव्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद दिल्याची चर्चा होती परंतु प्रत्यक्षात त्यांचा पत्ता कट झाला आहे. त्यांच्या जागी रत्नागिरीचे उदय सामंत यांना मंत्रीपद देण्यात आले. विशेष म्हणजे केसरकर यांच्याकडे असलेले पालकमंत्रिपद उदय सामंत यांच्या पारड्यात टाकण्यात आले आहे. त्यामुळे इतके दिवस केसरकर विरुद्ध राणे असा रंगलेला सामना आता काही अंशी पाहता येणार नाही. त्याठिकाणी पालकमंत्री म्हणून उदय सामंत जागा घेण्याची शक्यता आहे. सद्य:स्थिती लक्षात घेता माजी खासदार नीलेश राणे यांच्या डिग्रीचा विषय असो किंवा अन्य राजकीय विषयावरून उदय सामंत यांनी त्यांना सातत्याने टार्गेट केले आहे. त्यांच्याविरोधात टोकाची टीका केली आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्याची पालकत्वाची जबाबदारी घेणारे उदय सामंत राणेंना कसा पलटवार देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या सर्व घडामोडी नाट्यात केसरकर मात्र गप्प आहेत. मी नाराज नाही असे सांगून त्यांनी आपण आता संघटना, आणि व्यवसाय वाढीकडे लक्ष देणार असल्याचे जाहीर केले आहे तर खासदार विनायक राऊत यांनी मागच्या वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान दिले होते. आता रत्नागिरीला मंत्रीपद दिले आहे असे सांगून या चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व चर्चेनंतर त्याचा पक्षावर नेमका कोणता परिणाम होतो हे मात्र गुलदस्त्यात आहे. एकंदरीत गेल्या तीन चार वर्षाचा आढावा लक्षात घेता केसरकर यांनी याठिकाणी राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झाल्यानंतर शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडली होती. दहशतवादाचा मुद्दा वारंवार पुढे करून त्यांनी राणेंना रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आता मंत्रीपद सोडाच पालकमंत्रिपद सुद्धा त्यांच्याकडे नाही. त्यामुळे केसरकर आता कोणती भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

4