पुष्कराज कोले: अश्वमेध महोत्सवाचा उत्साहात समारोप
वेंगुर्ले : ता.१३ वेताळ प्रतिष्ठान महोत्सवाच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींना व्यासपीठ निर्माण करून देत असून सामाज हिताच्या आणि इतर क्षेत्रातील मौलिक उपक्रमातून विकास घडताना दिसून येतो. प्रतिष्ठांनचे हे ग्रामीण सर्वांगीण विकासाठीचे कार्य अखंड चालू ठेवावे, या कार्यात मी तुमच्या सदैव सोबत आहे असे प्रतिपादन उद्योजक तथा जिंदाल समूहाचे महाव्यवस्थापक पुष्कराज कोले यांनी अश्वमेध तुळस महोत्सवाच्या समारोप प्रसंगी केले.
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग च्या वतीने अश्वमेध तुळस महोत्सव च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासाहेब परुळकर, उद्योजक रघुवीर मंत्री, सहसंपर्क प्रमुख शैलेश परब, उद्योजक वीरेंद्र आडारकर, जि.प.सदस्य नितीन शिरोडकर, सभापती अनुश्री कांबळी, माजी सभापती तथा प. स. सदस्य यशवंत परब, आंतराष्ट्रीय खेळाडू अशोक दाभोलकर, निवृत्त शिक्षक रमण किनळेकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सचिन परुळकर, उपाध्यक्ष विवेक तिरोडकर, नाना राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी संपन्न झालेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर १५ दिवशीय शालेय व खुल्या स्तरावरील स्पर्धात्मक महोत्सव अंतर्गत ३३ स्पर्धामध्ये २००० हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग दर्शवला. यावेळी शैलेश परब यांनी प्रतिष्ठानच्या सर्वच उपक्रमाचा आढावा घेत कौतुक केले. तर वीरेंद्र कामत-आडारकर यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचा इतर युवा मंडळानी आदर्श घेत उपक्रम राबवावे असे आवाहन केले.