आम्ही व्यावसायिक, “मायनिंग लॉबी” म्हणून हेटाळणी नको…

318
2

पराग शिरोडकर; याच व्यवसायामुळे येथील जनजीवन सुरळीत असल्याचा दावा…

वेंगुर्ले : ता.१३
रेडी गावात मायनिंग व्यवसाय फार जुना आहे. गावातील पिढ्या या गोगटे व निमको च्या व्यवसायातुनच लहानाच्या मोठ्या झाल्या. शासनाचे सर्व नियम व अटी पाळूनच रेडित मायनिंग सुरू आहे. संबंधित अधिकारी वारंवार मायनिंग च्या जागेला तसेच वाहतूक मार्गाला भेट देऊन इन्स्पेक्शन करतात. त्यानुसार मायनिंग वर जीवन जगणारे चारशेच्या आसपास डंपर, दीडशे ते दोनशे कामगार तसेच त्यावर आधारित लहान लहान उद्योग सर्व नियम अटी व शर्तींचे पालन करून व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे मायनिंग व्यवसायात विविध स्तरावर काम करून जगणाऱ्या या सर्वांना मायनिंग लॉबी संबोधणे चुकीचे आहे, असे युनायटेड लॉजिस्टिक कंपनीच्या वतीने उद्योजक पराग शिरोडकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
रेडी गावात मायनिंग व्यवसायावर आधारित डंपर, चहा पान टपरी, खानावळी हे व्यवसाय चालले. तसेच मायनिंगमुळे शिरोडा व आरोंदा बाजारपेठ सतत गजबजलेल्या असायच्या हे सांगायला बाहेरच्या माणसाची गरज नाही. ज्याप्रमाणे रेडी गावाने भरभराटीचा काळ पाहिला तसाच काळ १९९२ सली आलेल्या उषा इस्पात या कंपनीने दाखविला. पण याउलट स्थितीही रेडी गावाने पाहिली आहे. १९८९ ते २००३ पर्यंत सर्व मायनिंग बंद झाल्यावर आर्थिक सावटाचा अनुभव सर्वांनी घेतला आहे. उषा इस्पात कंपनीची भरभराटी पाहिलेल्या रेडी ने कंपनीचा अंतही आपल्या डोळ्यांनी पाहिला आहे. त्यावेळी कित्येक डंपर मालक बँक हप्त्याने बेजार झाले, कित्येकांनी कवडीमोल किमतीने डंपर विकले, कित्येक कर्जबाजारी झाले, तर कित्येक तरुण गाव सोडून अत्यल्प पगारावर गोवा राज्यात कामाला जाऊ लागले.
जेव्हा शासनाने रेडी पोर्ट ला बंदर विकसित करण्यास सांगितले तेव्हा परत एकदा रेडित उद्योग-व्यवसाय बहरणार याची चाहूल लागली. रेडी पोर्ट ची एक खास मागणी होती ती म्हणजे स्वतःचा रस्ता व्हावा व त्यातून वाहतूक व्हावी. रेडी पोर्ट ने जेव्हा या गोष्टी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा रेडी येथून एक्सपोर्ट व इम्पोर्ट दोन्ही होणार हे सिद्ध झाले. आज जयगड बंदराची उलाढाल करोडो रुपयांच्या घरात आहे. याच दरम्यान आय.एल.पी.एल. व फोमेंतो ग्रुप ने सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून मायनिंगला सुरुवात केली व परत एक वेळ रेडित आर्थिक उलाढाल होऊ लागली. रेडी पोर्ट तसेच आय. एल.पी.एल. यांनी पर्यावरणाला सांभाळून ग्रामस्थांचा विचार करून अनेक शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरण पूरक कामास सुरुवात केली. यामध्ये आरोग्यसेवांचा ही समावेश आहे. पण काहींना मायनिंगमुळे नुकसानच झाले, हानीच झाली, असंतोष आहे असे वाटणारे काही असंतुष्ट आहेत. मायनिंगमुळे सगळीकडे धूळ उडते म्हणणाऱ्यांना मायनिंग च्या टँकरने रस्त्यावर पाणी मारून धुळीचे प्रमाण कमी केले जाते हे दिसत नाही. गावातील सर्व प्रकारच्या सामाजिक धार्मिक, शैक्षणिक, संस्कृतिक, क्रीडा, कला व वाणिज्य या सर्वांना मायनिंग व्यवसायाचा थोडा ना थोडा हातभार लागलेला आहे.
मायनिंग व्यवसाय बेकायदेशीर, चुकीचा आहे असे म्हणणाऱ्यांनी या रेडी गावात एखादा मोठा पर्यावरण पूरक व्यवसाय आणण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसत नाही. मात्र मायनिंग व्यवसायात रेडी गावातील लोकही आहेत हे ते विसरतात. रेडी पोर्ट ने जेव्हा जमीन एक्वारेशन ला सुरुवात केली त्यामुळे ज्यांचे इन्कम बुडाले ते या व्यवसायाला नावे ठेवत आहेत. २०१० साली याच मायनिंग व्यवसायिकां सोबत काम करणारे लोक आता मायनिंग व्यवसायाला लॉबी म्हणून या व्यवसायाची बदनामी करत आहेत. रेडी गावात असंतोष, एल्गार, उद्रेक होणार असे म्हणणाऱ्यांनी आपल्या पाठीशी किती लोक आहेत याची चाचपणी करावी. कारण रेडीतील जनता खोट्या व बदनामीकारक गोष्टींना कधीही साथ देणार नाहीत. एकीकडे विकास हवा म्हणायचे आणि तसा प्रयत्न जे करतात त्यांच्यावर भकास हा शिक्का मारायचा हे आता संबंधित लोकांनी सोडून द्यावे. जर तथाकथित मायनिंग लॉबी विरोधात खूप मोठे जनमत असेल तर त्यांनी सर्व लोकांना एकत्र करून मायनिंग बंद करावे आणि इथल्या बेरोजगारांना रोजगार द्यावा. विकास हा चर्चा, विचारविनिमय यातून होतो याची जाणीव ठेवून विरोध करणाऱ्यांनी विकासाच्या मुद्द्यावर केव्हाही चर्चेला यावे असेही श्री. शिरोडकर यांनी पत्रकात म्हटले आहे.

4