मालवणात लवकरच ‘मत्स्यदुष्काळ परिषद’…

188
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

पारंपरिक मच्छीमारांच्या बैठकीत निर्णय ; शासनाचे लक्ष वेधणार…

मालवण, ता. १३ : जिल्ह्यातील रापण आणि गिलनेटधारक मच्छीमारांना भेडसावणाऱ्या मत्स्यदुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मालवणात लवकरच ‘मत्स्यदुष्काळ परिषदे’चे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
मत्स्यदुष्काळाच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासंदर्भात पारंपरिक मच्छीमारांची बैठक आज झाली. या बैठकीत मत्स्यदुष्काळ परिषद आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आली. यावेळी मिथुन मालंडकर, आबा वाघ, महेंद्र पराडकर, नितीन परुळेकर, भाऊ मोरजे, वसंत गावकर, संतोष देसाई, रॉकी डिसोजा, संजय जामसंडेकर, संदीप शेलटकर, नारायण शेलटकर आदी उपस्थित होते.
या परिषदेस पारंपरिक मच्छीमारांसाठी कार्यरत असलेल्या देश व राज्य स्तरावरील विविध मच्छीमार संघटनांचे पदाधिकारीव कार्यकर्ते, मत्स्य अभ्यासक यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच लोकप्रतिनिधींनाही या बैठकीस आमंत्रित करून त्यांची मत्स्यदुष्काळाबाबतची भुमिका जाणून घेतली जाणार आहे. सिंधुदुर्गसह राज्यातील सागरी पारंपरिक मच्छीमार शासनाकडे मत्स्यदुष्काळ जाहीर करण्याची मागणी गेले वर्षभर करीत आहेत. परंतु मत्स्यदुष्काळ जाहीर केला गेलेला नाही. मत्स्यदुष्काळ जाहीर करण्यासाठी शासकीय निकष आडवे येत असतील तर ते बदलण्याची आज गरज आहे ईतकी परिस्थिती गंभीर आहे. यावर्षीच्या मत्स्य हंगामात बांगडा, पापलेट, तारली, सौंदाळा, पेडवे, कोळंबी आदी महत्त्वाचे मासे पारंपरिक मच्छीमारांना मिळण्याचे प्रमाण प्रचंड घटले आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. मासे मिळत नसल्याने मासेमारीचे प्रमाण घटले आहे. मच्छीमारांच्या जेवणातूनही मासे गायब झाले आहेत. हीच परिस्थिती शासनासमोर व्यापक स्वरूपात मांडून पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळवून देण्यासाठी मत्स्यदुष्काळ परिषदेचे आयोजन करणार असल्याचे पारंपरिक मच्छीमारांनी सांगितले. परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स आणि एलईडी पर्ससीनद्वारे होणारी बेकायदेशीर अतोनात मासेमारी यामुळे मत्स्यदुष्काळाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अवेळी होणारा पाऊस तसेच वादळी वा-यांचा फटकाही मत्स्य व्यवसायास बसला आहे. या सर्व कारणांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ही मत्स्यदुष्काळ परिषद आयोजित केली जाणार आहे. दरम्यान दुष्काळ परिषदेचे स्वरूप व रुपरेषा आखण्यासाठी जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमारांची बैठक येत्या २० जानेवारी रोजी मालवणात बैठक होणार असल्याचे मच्छीमारांनी सांगितले.

\