थकीत मानधन न मिळाल्यास प्रजासत्ताक दिनी उपोषण…

177
2

सावंतवाडी तालुका पाणलोट समिती सचिवांचा इशारा….

बांदा.ता,१३: 
थकित मानधनाबाबत सावंतवाडी तालुका पाणलोट समिती सचिव संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. अॉक्टोबर २०१७ पासूनचे मानधन, प्रवास भत्ता व कार्यालयीन खर्च येत्या आठ दिवसांत न मिळाल्यास प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा एकमुखी निर्णय संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. तशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी व सावंतवाडी तालुका कृषी अधिकार्‍यांना सादर करण्यात आले.
सावंतवाडी तालुका पाणलोट समिती सचिव संघटनेची तातडीची बैठक सावंतवाडीत संपन्न झाली. बैठकीमध्ये कृषी विभागाच्या अनागोंदी कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. जिल्हा पाणलोट कक्षात सचिवांचा मानधन निधी जमा असतानाही तो अदा करण्यात चालढकल केल्याबद्दल कृषी विभागावर संताप व्यक्त करण्यात आला. पाणलोट प्रकल्प राबविण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणार्‍या सचिवांवर सध्या उपासमारीची पाळी आली असून त्यांच्यावर बेकारीची कुर्‍हाड कोसळल्याकडेही लक्ष वेधण्यात आले. पालकमंत्री ना. उदय सामंत यांनाही थकित मानधनाबाबतचे निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
सावंतवाडी कृषी कार्यालयात सावंतवाडी मंडळ कृषी अधिकारी व्ही. एस. वाघमारे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. थकित मानधनाचा विषय जिल्हा स्तरावरील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपोषणाचे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश आडेलकर यांनी वाघमारे यांच्याकडे सुपूर्द केले.
यावेळी संघटनेचे सचिव सिद्धेश्वर मसुरकर, संजय कानसे, प्रविण परब, अनुजा देसाई, निर्जरा परब, श्रीकृष्ण रेडकर, श्याम कुबल, लुमा जाधव, रोशनी जाधव, दिलीप गावडे, दिनेश सावंत, सचिन देसाई, सुर्याजी देसाई, विश्वनाथ पंडीत, राजन हळदणकर, वाय. डी. सावंत, प्रगती जेठे, स्मिता हरमलकर, प्रसाद वैज, अमित गावडे, सागर पटेकर, कमलाकर राऊत, बाबुराव गवस, सलिका बिजली, खेमराज सावंत, विवेक सावंत, अतुल सावंत, अमोल कोरगावकर, मनिष गावडे आदी सचिव उपस्थित होते.

4