पंचायत समितीचे आयोजन ; पाताडे-परुळेकर यांची माहिती…
मालवण, ता. १३ : पदाधिकारी, कर्मचार्यांमध्ये उत्साह निर्माण होण्याबरोबरच त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने मालवण पंचायत समितीच्यावतीने १६, १७ व २२ जानेवारीला कला, क्रीडा महोत्सव व स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन १६ रोजी टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर माजी खासदार नीलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती पंचायत समितीचे सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मालवण पंचायत समितीच्या सभापती दालनात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, कक्ष अधिकारी शिवाजी पवार, अरविंद घाडी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
पंचायत समितीच्यावतीने दरवर्षी कला, क्रीडा महोत्सव व स्नेहसंमेलन घेण्यात येते. मात्र यावर्षी जिल्हा परिषदेची चॅम्पीयनशीप मिळविण्याच्या दृष्टीकोनातून तसेच पदाधिकारी, कर्मचार्यांचा उत्साह वाढावा यासाठी कला, क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. १६ रोजी सकाळी आठ वाजता महोत्सवाचे उद्घाटन माजी खासदार राणे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास आमदार वैभव नाईक, दत्ता सामंत, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्यासह पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच, आजी, माजी पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. पत्रकार व पदाधिकारी यांच्यात क्रिकेटचा सामना होणार आहे. त्यानंतर क्रिकेटचा अंतिम सामना होईल. वैयक्तिक स्पर्धा होतील. १७ रोजी सांघिक स्पर्धा होणार आहेत. क्रीडा महोत्सवात क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, लगंडी, रस्सीखेच तसेच बॅडमिंटन, कॅरम, बुद्धीबळ यासारख्या स्पर्धा होणार आहेत.
२२ रोजी दुपारी दोन वाजता नगरपालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात स्नेहसंमेलन होणार आहे. याचे उद्घाटन खासदार नारायण राणे, आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत होईल. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने माजी सभापती, उपसभापती, उल्लेखनीय कामगिरी बजावणारे सरपंच, पुरस्कारप्राप्त पत्रकार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार होणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम दरम्यान क्रीडा महोत्सवातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक दिले जाणार आहे अशी माहितीही श्री. पाताडे, श्री. परुळेकर यांनी दिली.