वागदे येथील घटना ः पोलिसांत गुन्हा दाखल
कणकवली, ता.13 ः घरात कुणी नसल्याची संधी साधून संशयित चोरट्याने प्रवेश केला. मात्र अचानक घरातील मंडळी आल्याने त्याची पळताभुई झाली. यात दुसर्या मजल्यावरून पडून संशयित चोरटा गंभीर जखमी झाला. राघवेंद्र नरेंद्र जाधव (वय 30,रा.मध्यप्रदेश) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून हायवे ठेकेदार कंपनीकडे तो मजूरीला होता.
शहरालगतच्या वागदे गडनदीपुलाजवळ महेंद्र अंधारी यांचे घर आहे. भालचंद्र महाराज उत्सवातील काकड आरतीसाठी त्यांच्या घरातील मंडळी पहाटे पाचच्या सुमारास बाहेर पडली होती. ही संधी साधून संशयित राघवेंद्र जाधव हा त्यांच्या घरात शिरला. दरम्यान अंधारी कुटुंबीय काही कामानिमित्त काही वेळातच पुन्हा घरी आली. त्यावेळी घरात चोरटा शिरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरड करताच घरात शिरलेल्या राघवेंद्र जाधव याने दुसर्या मजल्यावरून उडी मारली. यात तो खाली पडून जायबंदी झाला. त्यानंतर त्याला कणकवली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याच्यावर सध्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.