अपेक्षित बूथ प्रमुख निश्चित न झाल्याचे पक्ष निरीक्षकांनी केले स्पष्ट ; आठ दिवसांची मुदत…
मालवण, ता. १३ : तालुक्यात अपेक्षित बूथ प्रमुखांची नियुक्ती झाली नसल्याने भाजप तालुकाध्यक्ष निवड प्रक्रिया होऊ शकली नाही. बूथ प्रमुखांच्या निवडीची प्रक्रिया येत्या आठ दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना पक्ष निरीक्षक प्रभाकर सावंत यांनी बैठकीत दिल्याचे कळते.
दरम्यान याची कार्यवाही न झाल्यास तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांची नियुक्ती जिल्हा स्तरावरून केली जाईल असेही सांगण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
मालवण भाजप कार्यालयात तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष निवड प्रक्रियेसाठी महत्त्वपूर्ण बैठक पक्ष निरीक्षक प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीस तालुक्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप तालुकाध्यक्ष पदासाठी राजा गावडे, धोंडी चिंदरकर यांची तर शहराध्यक्ष पदासाठी दीपक पाटकर यांचे नाव चर्चेत होते अशी माहिती मिळाली. मात्र तालुकाध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रिया करण्यापूर्वी तालुक्यात १२१ बुथ पैकी किमान ६२ बुथ कमिट्या व बुथप्रमुख यांची निवड निश्चित असायला हवी होती. परंतु ती झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रत्यक्षात बुथप्रमुखांची अपेक्षित प्रक्रिया न झाल्याचे स्पष्ट झाल्याने आजची तालुकाध्यक्ष निवड प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. बुथ कमिट्या, प्रमुखांची निवड प्रक्रियेसाठी आठ दिवसांचा कालावधी दिला आहे. या मुदतीत कार्यवाही न झाल्यास जिल्हास्तरावरून तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांची थेट नियुक्ती जाहीर केली जाणार असल्याचे पक्ष निरीक्षकांनी बैठकीत स्पष्ट केल्याचे समजते. त्यामुळे नूतन तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष म्हणून कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.