विरोधी नगरसेवकांचा आरोप: भ्रष्टाचारात समिती मुख्याधिकारी आणि जिल्हा प्रशासन सहभाग असल्याचाही आरोप….
कणकवली ता.१४: कणकवली नगरपंचायतीच्या कचरा टेंडरमध्ये 52 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नगरपंचायतीचे विरोधी नगरसेवक कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, सुशांत नाईक यांनी केला. कचरा उचलण्यासाठी यापूर्वी वर्षाला 1 कोटी 17 लाख रुपये खर्च येत होता. मात्र नवीन निविदा 1 कोटी 69 लाख रुपयांना मंजूर करण्यात आली आहे. हे वाढीव 52 लाखाचे टेंडर नगरपंचायतीची स्थायी समिती, मुख्याधिकारी आणि जिल्हा प्रशासन यांच्या संगनमताने मंजूर झाल्याचाही आरोप भाजप आणि शिवसेना नगरसेवकांनी केला.
येथील शासकीय विश्रामगृहात भाजप नगरसेवक रुपेश नार्वेकर, शिवसेनेचे नगरसेवक सुशांत नाईक, स्वीकृत नगरसेवक कन्हैया पारकर, यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी योगेश मुंज, सुजित जाधव शेखर राणे आदी भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कन्हैया पारकर म्हणाले, नगरपंचायतीचा कचरा टेंडरला पहिल्या निविदा मागणीमध्ये 3 ठेकेदारानी सहभाग दर्शवला. मात्र कागदपत्रांची अपूर्णता असल्याने निविदा उघडण्यात आल्या नाहीत. दुसऱ्या निविदे वेळी फक्त एका ठेकेदाराने टेंडर भरले होते. हाच ठेकेदार सध्या नगरपंचायतीचा कचरा संकलन करण्याचे काम करत आहे. दुसऱ्या निविदेवेळी ठेकेदाराने तब्बल 52 लाख रुपये जादा दराचे टेंडर भरले होते. तत्कालीन मुख्याधिकारी जयंत जावडेकर नगरपंचायतीची स्थायी समिती यांनी या वाढीव टेंडरला मंजुरी दिली तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला जिल्हा प्रशासनाने देखील डोळेझाक करून या टेंडर प्रक्रियेला मंजुरी दिली. नगरपंचायतीने 52 लाख रुपये जादा दराने टेंडर मंजूर केले असले तरी कचरा संकलनासाठी जादा कर्मचारी नेमण्यात आलेले नाहीत. जादा गाड्यांची ही व्यवस्था करण्यात आलेली नाही. पूर्वी एवढ्या 40 कर्मचाऱ्यांकडून कचरा संकलनाचे काम केले जाते. पूर्वीचीच यंत्रणा वापरली जात असेल तर 52 लाख रुपये जादा दराची निविदा कशासाठी मंजूर करण्यात आली. हा मोठा भ्रष्टाचार आहे असा आरोप कन्हैया पारकर व इतर नगरसेवकांनी केला.