शिवसेनाप्रमुखांच्या जयंती निमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन…

98
2

तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची माहिती…

मालवण, ता. १४ : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मालवण तालुका शिवसेना शाखेच्या वतीने २१, २२ व २३ जानेवारी रोजी विविध कार्यक्रम तसेच रांगोळी, मेहंदी, पाककला व गजर बाळासाहेबांचा भजन स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त २३ रोजी बाळासाहेबांच्या जयंतीदिनी मालवण शहरातून बाळासाहेबांच्या प्रतिमेची भव्य रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख तथा जि. प. सदस्य हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मालवण शिवसेना शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी माहिती दिली. यावेळी उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, नगरसेवक मंदार केणी, शहरप्रमुख बाबी जोगी, तपस्वी मयेकर, सचिन गिरकर, दीपेश परब, सुरेश मडये आदी उपस्थित होते.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने २१ जानेवारी रोजी सकाळी ८ ते दुपारी ३ यावेळेस सिंधुदुर्ग किल्ल्यात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तर दुपारी ३ ते सायंकाळी ५ पर्यंत मामा वरेरकर नाट्यगृह येथे रांगोळी स्पर्धा आयोजित केली. यातील विजेत्यांना अनुक्रमे रु.२०००, रु. १५०० व रु.१००० अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. तर दि. २२ रोजी सकाळी ९ ते दु. १२ यावेळेस मामा वरेरकर नाट्यगृह येथे जिज्ञासा वनौषधी संस्था व शिवसेना यांच्या वतीने आयुर्वेदिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुपारी ३ वाजता मामा वरेरकर नाट्यगृहात महिलांसाठी मेहंदी स्पर्धा होणार असून प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे रु.२०००, रु.१५००, रु.१००० अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.
२३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिवशी सकाळी १० वाजता मालवण शहरातून बाळासाहेबांच्या प्रतिमेची भव्य रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता शिवसेना शाखा, वाघ पिंपळ मालवण येथे महिलांसाठी पाककला स्पर्धा आयोजित केली असून स्पर्धेसाठी तांदळापासून बनविलेले खाद्यपदार्थ हा विषय ठेवण्यात आला आहे. या स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे रु.२०००, रु.१५००, रु.१००० अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता शिवसेना शाखेनजीक ‘बाळासाहेबांचा गजर’ ही जंगी भजन स्पर्धा तालुका स्तरावर आयोजित केली आहे. यातील प्रथम विजेत्यांना अनुकमे रु.५०००, रु.३०००, रु.२००० व उत्तेजनार्थ प्रत्येकी तीन रु.१००० अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील भजनात बाळासाहेबांवर आधारित गजर सादर करणे महत्वाचे आहे. प्रथम १० स्पर्धकांनाच स्पर्धेत प्रवेश देण्यात येणार आहे.
रांगोळी, मेहंदी व पाककला स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी सेजल परब (९४०५५३२७८४), पूनम चव्हाण (७५८८८५९६७५) यांच्याशी तर भजन भजन स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी मालवण शिवसेना शाखा व सुरेश मडये (९७६४३६८८८०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी हरी खोबरेकर यांनी केले.

4