भामटा चिपळूण येथून ताब्यात…
बांदा, ता. १४ : टॅक्स बचतीच्या योजनेंतून टॅक्स रिफंड मिळवून देण्याच्या आकर्षक योजना सांगून बांदा एमएसईबीच्या तीन कर्मचार्यांची सुमारे सव्वा चार लाख रुपयांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. नोव्हेंबर महिन्यात कलंबिस्त येथील पास्ते नामक एजंटने ही फसवणूक केल्याचे समजते.
टॅक्स रिफंड मिळाल्याची खात्री व्हावी यासाठी काही ठराविक रक्कमही तीनही कर्मचार्यांना डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून देऊन विश्चास संपादन करण्यात तो यशस्वी झाला होता. मात्र त्यानंतर वारंवार पाठपुरावा करुनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने तीनही कर्मचार्यांना आपण फसलो गेल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबतची माहिती सहाय्यक अभियंता सुभाष आपटेकर यांना दिली. त्यानंतर बांदा पोलीसांत रीतसर तक्रार करण्यात आली होती.
बांदा पोलीस निरीक्षक ए. डी. जाधव यांनी तातडीने तपास करुन संबंधित भामट्याला चिपळूण येथे ताब्यात घेतल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलीसांनी याबाबत कमालीची गुप्तता पाळली होती.
ताब्यात घेतलेल्या भामट्यासोबत अजून दोघे संशयित असल्याचा संशय बांदा पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांना देखील लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.