‘त्या” गटाराच्या कामाचे अंदाजपत्रक डी.एस.आर. रेट प्रमाणे नसल्याने नामंजूर…

130
2

वेंगुर्ले नगर परिषदेच्या विशेष सभेत निर्णय

वेंगुर्ले : ता.१४
वेंगुर्ले गाडीअड्डा ते नगरवाचनालय पर्यंत जाणाऱ्या गटारात सांडपाणी सोडले जात असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. यावर उपाययोजनेसाठी ठरविलेल्या कामाचे अंदाजपत्रक डी.एस.आर. रेट प्रमाणे नसल्याने ते आजच्या नगर परिषदेच्या विशेष सभेत नामंजूर करण्यात आले. तसेच नवीन अंदाजपत्रक तयार करून त्यास मान्यता घेणे आणि न.प.ला प्राप्त बक्षीस रकमेचा वापर या कामासाठी करता यावा यासाठी अनुमति मिळावी म्हणून शासनाकडे पत्रव्यवहार करण्याचे ठरले.
वेंगुर्ले नगरपरिषदेची विशेष सभा नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक तुषार सापळे, सुहास गवंडळकर, प्रशांत आपटे कुमा गावडे, धर्मराज कांबळी, शीतल आंगचेकर, पुनम जाधव, कृपा गिरप- मोंडकर, साक्षी पेडणेकर तसेच अधिकारी संगीता कुबल, अभी गिरप आदि उपस्थित होते.
वेंगुर्ले येथील या एकमेव विषयासाठी हि सभा बोलावली होती. गाडीअड्डा ते नगरवाचनालय पर्यंत जाणाऱ्या पावसाळी गटारात आजूबाजूच्या इमारतींचे सांडपाणी, मच्छी मार्केटचे माशाचे पाणी तसेच हॉटेल व्यवसायिकांचे सांडपाणी सोडले जाते. परिणामी गटाराच्या आजूबाजूच्या नागरिकांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. यावर उपाययोजनेसाठी नगरपरिषद प्रयत्नशील आहे. या दुर्गंधीपासून नागरिकांची सुटका व्हावी म्हणून गटाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पाईपलाईन व त्यावर चेंबर बसविण्याचे न. प.ने ठरविले आहे. त्या अनुषंगाने मुंबई येथील साई कंपनीकडून या कामाचे अंदाजपत्रक मागवण्यात आले होते. हे अंदाजपत्रक आजच्या विशेष सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले. मात्र हे अंदाजपत्रक डी. एस. आर. रेट प्रमाणे नसल्याने या अंदाजपत्रकास मंजुरी देणे योग्य नाही. माझा या अंदाजपत्रकास विरोध असल्याचे नगरसेवक तुषार सापळे यांनी जाहीर केले. तसेच आपला सदर कामाला विरोध नसून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लाखो रुपये खर्च करून होणाऱ्या या कामाच्या अंदाजपत्रकात त्रुटी जाणवतात. डीएसआर प्रमाणे अंदाजपत्रक झाल्यास हा खर्च कमी होऊ शकतो. आणि कामही चांगले होऊ शकते. यावेळी सुहास गवंडळकर, शितल आंगचेकर, प्रशांत आपटे यांनीही आपले मत नोंदविताना डी.एस.आर प्रमाणे अंदाजपत्रक करावे असे सुचवले. सर्वांच्या सूचनांचा विचार करता उपरोक्त निर्णय घेण्यात आला.
दोन दिवसांपूर्वी संबंधित नागरिकांनी नगरपालिकेला निवेदन देऊन सदर दुर्गंधीयुक्त गटाराचा बंदोबस्त करावा अन्यथा २६ जानेवारी रोजी आपण उपोषणास बसू असा इशारा दिला आहे. हे जरी सत्य असले तरी आम्ही त्या नागरिकांच्या हितासाठीच ही भूमिका घेत आहोत. त्यामुळे त्या नागरिकांशी या विषयावर चर्चा करूया व मार्ग काढूया असे तुषार सापळे, शितल आंगचेकर यांनी सांगितले.

4