अविनाश भोसले;कणकवलीत वाहतूक पोलिसांचे रस्ता सुरक्षा अभियान….
कणकवली, ता.१५: वाहन चालविताना आपण सेकंदाचा हिशेब घालतो आणि वाहनाचा वेग वाढवतो. यात अनेक वेळा वाहन चालकांना जीव गमावण्याची वेळ येते. पण काळजी घेऊन गाडी चालवली तर एक मिनिट उशीर होईल पण लाख मोलाचा जीव निश्चितपणे वाचेल असे प्रतिपादन जिल्हा वाहतूक पोलिस निरीक्षक अविनाश भोसले यांनी आज येथे केले.
जिल्हा वाहतूक पोलिस,सिंधुदुर्ग यांच्या वतीने आज कणकवलीत रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती कार्यक्रम झाला. यात कणकवली उपजिल्हा रुग्णालय प्रवेशव्दारावर वाहनचालकांची नेत्र तपासणी करण्यात आली. यावेळी जिल्हा वाहतूक सहाय्यक पोलिस निरीक्षक अरुण जाधव,उपजिल्हा रुग्णालयातील नेत्रतपासणी डॉ.चेतन कोरे, मोटार वाहन निरीक्षक अलमवार, विश्वजित परब, प्रकाश गवस, शशिकांत कदम, वस्त्याव पिंटो, सुनील निकम, अविनाश गायतोडे, व्ही.एस.देसाई, रविकांत बुचडे आदी वाहतूक पोलिस, वाहनचालक, नागरिक उपस्थित होते.
रस्ते सुरक्षा हा विषय प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित आहे. वाहतूक नियमांची जागरूकता व्हावी यासाठी पोलिस प्रशासनाकडून वेळोवेळी कार्यशाळा व्दारे किंवा पत्रकाव्दारे जनजागृती केली जाते. जर सर्वांनीच वाहन चालविताना काळजीपूर्वक वाहन चालविल्यास व वाहतुक नियमांचे काटेकोर पालन केल्यास अपघाताचे प्रमाण कमी होण्यास निश्चित मदत होईल. अपघाताचे प्रमाण शुन्य टक्के व्हावं यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा वाहतूक पोलिस निरीक्षक अविनाश भोसले यांनी केले.