कणकवलीत जयभगवान गोयल यांचा निषेध

88
2

पुस्तकाच्या प्रती जप्त करण्याची मागणी ः प्रांताधिकार्‍यांना निवेदन

कणकवली, ता.15 ः ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ हे पुस्तक लिहून प्रकाशित करणार्‍या जयभगवान गोयल यांचा आज कणकवलीत शिवप्रेमींनी निषेध केला. तसेच या पुस्तकावर बंदी आणावी. पुस्तकाच्या विकलेल्या सर्व प्रती जप्त कराव्यात अशी मागणी प्रांताधिकार्‍यांकडे करण्यात आली. बेरोजगारी, महागाई या विषयावरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी केंद्रातील भाजप सरकार अशा भावनिक मुद्दयांना हात घालत असल्याचा आरोपही शिवप्रेमींनी केला.
भाजपच्या जयभगवान गोयल यांनी नुकतेच ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित केले होते. मात्र छत्रपतींची तुलना मोदींची नव्हे तर कुणाशीच होऊ शकत नाही. मात्र केंद्र सरकार आणि भाजपची नेतेमंडळी भावनिक मुद्दयांना हात घालून वादग्रस्त मुद्दे पुढे आणत आहेत. छत्रपतींची मोदींशी तुलना करणारे पुस्तक आणणे हा देखील याचाच एक भाग आहे. या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते एस.टी.सावंत, विनायक मेस्त्री, अनुप वारंग, सानिक कुडाळकर यांनी सांगितले.
शहरातील शिवप्रेमींनी आज एकत्र येऊन प्रांताधिकारी कार्यालयासमोर गोयल यांचा निषेध केला. त्यानंतर पुस्तकावर बंदी आणणे आणि विकलेल्या प्रती जप्त करण्याबाबतचे निवेदन त्यांनी प्रांताधिकार्‍यांना दिले. यावेळी धनंजय सावंत, जयानंद फाटक, संदीप सावंत, आतिष जेठे, रोशन तांबे, महानंदा चव्हाण, हेमंत कांडर, संजय राणे, लवू वारंग, अभिजित सावंत, तेजस राणे, रूपेश आमडोसकर, निळकंठ वारंग, निसार शेख, ललित घाडीगावकर, प्रथमेश परब, सिकंदर मेस्त्री, शैलेश भोगले, शेखर राणे, संदेश सावंत, सुजित जाधव, भास्कर राणे, महेंद्र सांबरेकर, अभय राणे, अविनाश राणे आदी उपस्थित होते.
——————

4