कणकवलीत ‘पंचायत समिती आपल्या दारी’ उपक्रम

143
2

सभापती दिलीप तळेकर यांची माहिती ः जनतेचे प्रश्‍न जाणून घेणार

कणकवली, ता.15 ः सर्वसामान्यांचे प्रश्‍न समजावून घेऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठी पंचायत समिती आपल्या दारी हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांनी आज दिली. 17 ते 24 जानेवारी या कालावधीत तालुक्यातील विभागांमध्ये यासाठी विशेष बैठका घेतल्या जाणार आहेत असेही ते म्हणाले.
कणकवली पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘पंचायत समिती आपल्या दारी’ या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी गटविकास अधिकारी मनोज भोसले, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री आदी उपस्थित होते.
श्री.तळेकर म्हणाले, वीज आणि रस्त्यांच्या समस्या, वाडी आणि गावातील पाणी टंचाई, शाळांना भेडसावणारे प्रश्‍न, कृषी पंप तसेच वीज जोडणी, विविध प्रकारचे दाखले आदी अनेकविध समस्या तालुक्यातील नागरिकांना भेडसावत आहेत. या समस्यांचे निरसन होऊन सर्वसामान्यांना न्याय मिळावा. त्यांचे प्रश्‍न तत्परतेने सोडविले जावेत यासाठी पंचायत समिती हा उपक्रम आम्ही राबवत आहोत.
या उपक्रमाचा शुभारंभ 17 रोजी सकाळी 11 वाजता वारगाव ग्रामपंचायत येथून होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी 3 वाजता नांदगाव विभागातील गावांसाठी नांदगाव ग्रामपंचायत येथे बैठक होईल. 18 रोजी सकाळी 11 वाजता हरकुळ बुद्रूक ग्रामपंचायत कार्यालयात तर सायंकाळी तीन वाजता कळसुली विभागातील गावांची बैठक हळवल ग्रामपंचायत येथे होणार आहे. 20 रोजी
कलमठ-वरवडे बिडवाडी विभागातील गावांसाठी कलमठ ग्रामपंचायतीच्या सभागृहात सकाळी 11 वाजता बैठक होईल. 22 रोजी लोरे विभागातील गावांची बैठक ग्रामपंचायत येथे होईल तर 24 रोजी जानवली ग्रामपंचायती मध्ये या विभागातील गावांची बैठक होणार आहे. या बैठकीला सर्व खातेप्रमुख उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे प्रलंबित प्रश्नांचाही निपटारा होण्यास मदत होईल असे श्री.तळेकर म्हणाले.

4