प्रमोद जठारांचा चिमटा; नव्या पालकमंत्र्यांचा अविश्वास असल्याचा आरोप…
कणकवली, ता.१६: सिंधुदुर्गचे नवे पालकमंत्री उदय सामंत यांनी पूर्वीचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर अविश्वास दाखवला आहे. त्यांनी आमदार वैभव नाईक यांना प्रभारी पालकमंत्री घोषित केले आहे. त्यामुळे केसरकरांना शिवसेनेत कुणीच आपलं मानायला तयार नाही. पक्षात अशी लाचारी पत्करण्यापेक्षा आमदारकीचा राजीनामा द्या. आम्ही भाजपच्या तिकिटावर तुम्हाला निवडून आणतो अशी ग्वाही भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज दिली.
येथील भाजप कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगरसेवक शिशिर परुळेकर उपस्थित होते. श्री.जठार म्हणाले, राज्यात आणि जिल्ह्यातील महाविकास आघाडी मध्ये प्रचंड गोंधळ आणि अविश्वासाचे वातावरण आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा माजी पालकमंत्री दीपक केसरकर आणि आमदार वैभव नाईक यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. तर नव्या पालकमंत्र्यांनी केसरकर यांच्यावर अविश्वास दाखवत जिल्हा प्रभारीपदाची धुरा श्री.नाईक यांच्याकडे सोपवली. दुसरी महत्वाची बाब म्हणजे चांदा ते बांदा योजना बंद झाली तर मी आमदारकीचा राजीनामा देईल अशी घोषणा माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच चांदा ते बांदा योजना गुंडाळली आहे. त्यामुळे केसरकर यांनी आता आमदारकीचा राजीनामा द्यायला हवा. तसे शिवसेना पक्षात त्यांना फारसे स्थान उरलेले नाही. तसेच राज्यातील महाविकास आघाडीतील आमदारांमध्येही असंतोष आहे. या असंतोषाचे नेतृत्व श्री.केसरकर यांनी घ्यावे आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा. त्यांना भाजप पुन्हा निवडून आणण्यासाठी कटीबद्ध आहे.