प्रमोद जठार;खासगी उदयोजकाच्या माध्यमातून राबविला जाणार प्रकल्प….
कणकवली, ता.१६: कुडाळ, मालवण तालुक्यात चित्रपटगृह नाही. येथील रसिकांना नवनवीन चित्रपट पाहता यावेत यासाठी कुडाळ आणि मालवण येथे कंटेनरमधील फिरते चित्रपटगृह आणले जाणार आहे. आठवड्यातील चार दिवस कुडाळ आणि उर्वरित तीन दिवस मालवण तालुक्यातील आठवडा बाजारांच्या ठिकाणी कंटेनरमधील चित्रपटगृहाचा सेटअप असणार आहे. याबाबतची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिली.
श्री.जठार म्हणाले, देशभरात 500 ठिकाणी कंटेनरमधील फिरते चित्रपटगृह उभारण्याचा प्रयोग खासगी उद्योजकांकडून केली जात आहे. यात देशातील पहिले फिरते चित्रपटगृह सिंधुदुर्गात असणार आहे. या चित्रपटगृहाची रचना कंटेनर थिएटरप्रमाणेच असेल. आत 120 आसनाची सोय तसेच वातानुकूलित यंत्रणा आणि वायुविजन व्यवस्था असणार आहे. कुडाळ आणि मालवण तालुक्यातील आठवडा बाजाराच्या ठिकाणी हे चित्रपटगृह आणले जाणार आहे. युएफओ यंत्रणेच्या माध्यमातून देशभरात एकाच वेळी प्रक्षेपित होणारे चित्रपट या फिरत्या थिएटरमध्ये देखील दाखवले जाणार आहेत. या चित्रपटगृहासाठी लागणारा कर्मचारीवर्ग देखील स्थानिक असेल. एप्रिल पासून हे चित्रपटगृह कार्यान्वित होईल अशीही माहिती श्री.जठार यांनी दिली.