कर्मचाऱ्यांनी खेळाच्या माध्यमातून आरोग्य निरोगी ठेवावे…

156
2

 

माधुरी बांदेकर ; पंचायत समितीच्या कला, क्रीडा महोत्सवास सुरवात…

: मालवण पंचायत समिती, ग्रामपंचायत या ठिकाणी शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सेवा बजावताना आपल्या आरोग्याकडेही लक्ष द्यायला हवे. शरीर सुदृढ ठेवण्यासाठी खेळायला हवे. कर्मचाऱ्यांसाठी भरविलेला क्रीडा महोत्सव हा स्तुत्य उपक्रम आहे. कर्मचाऱ्यांनी केवळ क्रीडा महोत्सवा पुरते न खेळता यापुढेही नियमितपणे खेळ व कवायतीच्या माध्यमातून आपले आरोग्य निरोगी ठेवावे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती माधुरी बांदेकर यांनी येथे केले.
मालवण पंचायत समितीचे पदाधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने पंचायत समितीच्यावतीने आज पासून कला, क्रीडा महोत्सव व स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आज टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर महिला व बालकल्याण सभापती माधुरी बांदेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, उप मुख्यकार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, बाबा परब, पंचायत समिती सदस्य अशोक बागवे, कमलाकर गावडे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रफुल्ल देसाई, किशोर महाजन, बंटी केनवडेकर, हडी सरपंच महेश मांजरेकर आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे सत्कार व स्वागत करण्यात आले. यावेळी सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांची समयोचित भाषणे झाली.
या क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ पंचायत समिती सदस्य, अधिकारी कर्मचारी यांचा संघ व मालवण पत्रकार संघ यांच्यातील प्रदर्शनीय क्रिकेट सामन्याने झाला. यात पंचायत समिती संघाने १८ धावांनी विजय मिळवला. यानंतर अधिकारी, कर्मचारी यांच्या धावणे, लांब उडी, उंच उडी, बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन आदी विविध वैयक्तिक क्रीडा स्पर्धा पार पडल्या. १७ रोजी सांघिक स्पर्धा होणार आहेत. तर २२ रोजी दुपारी दोन वाजता पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात स्नेहसंमेलन होणार आहे.

4