एलईडी मासेमारी विरोधात लढा उभारणार
मालवण, ता. १६ : एलईडी मासेमारी बंदीबाबत यापुढील लढा हा आंदोलनात्मक, राजकीय तसेच न्यायालयीन पातळीवर लढला जाणार आहे. यासाठी सिंधुदुर्ग-रत्नागिरी-रायगड मच्छीमार समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे.
दापोली-गुहागर,-मंडणगड तालुका मच्छीमार संघर्ष समितीने सिंधुदुर्ग-रत्नागिरी-रायगड मधील प्रमुख संघटना व सहकारी संस्था प्रतिनिधींची बैठक दापोली येथे झाली. मच्छीमारांना भेडसावणारी एलईडी लाईट मासेमारी बंदीबाबत लढ्याची पुढील दिशा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यात सिंधुदुर्ग-रत्नागिरी-रायगड मच्छीमार समन्वय समितीची स्थापना करण्याचे ठरविण्यात आले. यात २१ सदस्यीय समन्वय समितीमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील सात सदस्य यांचा सहभाग असणार आहे. अतिशय नियोजनबद्ध लढा लढण्याची गरज उपस्थितांनी व्यक्त केली.
या बैठकीस स्थानिक आमदार योगेश कदम यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. रेवस ते रेडी मधील उपस्थित मच्छीमार प्रतिनिधींनी एलईडी लाईट मासेमारी बंदी फक्त कागदावरच असून सरकार व प्रशासनाला कोणतेही सोयरसुतक नाही याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी रविकिरण तोरसकर, गोरक्षनाथ नवरीकर, आप्पा वांदरकर, खलिल वस्ता, हरिश्चंद्र नाखवा, विश्वनाथ म्हात्रे, धर्मा घारबट, दीपक मुरकर, दिलावर गोदाड, ययाती शिवलकर, महेश आंबटे, संतोष पाटील, विशाल कोळी, धर्मेद्र भोईर, अभय पाटील, प्रवीण तांडेल, महादेव दिघीकर, मधुकर गोंधळी, पी. एन. चोगले, वामन खडपकर, रवी नाटेकर आदी उपस्थित होते.