मालवण, ता. १६ : तालुक्यातील मसुरे गावचे सुपुत्र, कणकवली शहरातील परिवर्तन चळवळीतील कार्यकर्ते तसेच ओटव–नांदगाव प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षक आनंद तांबे यांनी केलेल्या सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक कामाची नोंद घेत औरंगाबाद बोधी ट्री एज्युकेशन फाउंडेशन तर्फे त्यांना बोधी ट्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
औरंगाबाद तापडिया नाट्यगृहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना २०१९ सालचा हा मनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता प्रा. डॉ. वाल्मिकी सरवदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला नगरसेवक प्रा. सुनील मगरे, औरंगाबाद उपशिक्षणाधिकारी जालिंदर शेंडगे, अश्विनी लाटकर, सोमनाथ वाघमारे, डी.आर रोडगे, अवंतिका तांबे, आयुष तांबे उपस्थित होते.
तांबे विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून प्रसिद्ध असून शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जोपासत नवनवीन उपक्रम राबवित असतात. समूहनृत्य व समूहगान स्पर्धेत त्यांचे विशेष योगदान आहे. त्यांच्या शाळेतील अनेक मुले गुणवत्ता यादीत चमकली आहेत. त्यांचे शोधनिबंध व नवोपक्रम लेखन प्रसिद्ध आहेत. एक छायाचित्रकार म्हणून त्यांनी नावलौकिता प्राप्त केली असून त्यांच्या छायाचित्रांना पारितोषिकेही प्राप्त झाली आहेत. त्यांच्या या यशाबद्दल कणकवली पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, शिक्षण विस्तार अधिकारी गवस, केंद्रप्रमुख संतोष जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिप्ती परब यांनी अभिनंदन केले आहे.