सावंतवाडी कारागृहात नातेवाईकांना भेटण्यासाठी एक ते दीड लाखाचे “रेट”…

258
2

परशुराम उपरकरांचा आरोप; राजेश गावकर यांचा मृत्यू नैसर्गिक नसून तो “मर्डर”…

 

सावंतवाडी ता.१७: कैदयांना सुविधा देण्यासाठी,नातेवाईकांना भेटण्यासाठी,सावंतवाडी कारागृहात कार्यरत असलेले अधीक्षक योगेश पाटील यांनी एक लाखापासून दहा लाखापर्यंतचे “रेट” लावले होते.तसे आपल्याकडे पुरावे आहेत,असा आरोप मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.दरम्यान राजेश गावकर या कैदयाचा मृत्यू नैसर्गिक नसून तो “मर्डर” असल्याचा संशय त्यांनी यावेळी व्यक्त केला.या प्रकाराच्या चौकशीसाठी संबंधित अधिक्षकाचे निलंबन करून पुढील चौकशी करण्यात यावी,अशी मागणी आपण पण कारागृह महासंचालकांकडे केली आहे असेही त्यांनी सांगितले.
श्री.उपरकर यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली.यावेळी ते म्हणाले सावंतवाडी कारागृहाची सर्व कार्यपद्धती लक्षात घेता अधीक्षक योगेश पाटील हे मनमानी कारभार करत आहेत.कैदयांना भेटण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांकडून पैसे घेत होते.यात घरचे जेवण देणे,नातेवाईकांना भेटणे अश्या गोष्टीसाठी “रेट” ठरलेले होते.याबाबत आपल्याकडे पुरावे आहेत.त्याठिकाणी असलेल्या बंदिवाना पैकी काही लोकांनी आपल्याला माहिती दिली आहे.तसेच काही कर्मचाऱ्यांनी आपले पुरावे देण्याचे मान्य केले आहे.त्यामुळे हे सर्व पुरावे गोळा करून अधीक्षकांच्या विरोधात गावकर यांच्या कुटुंबीयांना घेऊन न्यायालयात दाद मागणार आहे,असे त्यांनी सांगितले.
श्री.उपरकर पुढे म्हणाले,मनसेच्या वतीने या प्रश्नासंदर्भात घंटानाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.हे आंदोलन २६ जानेवारीला होणार आहे.या प्रकरणात अधीक्षक सहिसलामत सुटू नये म्हणून त्याठिकाणी असलेल्या कैद्यांकडून गोपनीय पत्रे घेण्यात यावीत,अशी मागणी आपण केली आहे.त्यानुसार त्यांची चौकशी सुरू आहे.जोपर्यंत यांचे निलंबन केले जात नाही.तोपर्यंत मनसे गप्प गप्प बसणार नाही,असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

4