प्रशालेचा सांस्कृतिक उपक्रमही मुलांच्या कलागुणांना वाव देणारा : प्रा. डॉ. गणेश मर्गज..

2

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलच्या स्नेहसंमेलनाला प्रारंभ

वेंगुर्ले : ता.१७
विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धां बरोबरच अभ्यासातही नेहमी नंबर वन राहण्यासाठी प्रयत्न करावेत, कारण हे दिवस आयुष्यात पुन्हा येत नाहीत. सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल आपल्या प्रशालेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नेहमीच विविध उपक्रम राबवते. त्यांचा हा सांस्कृतिक उपक्रमही मुलांच्या कलागुणांना वाव देणारा आहे असे प्रतिपादन सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. गणेश मर्गज यांनी केले.
सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल वेंगुर्ले या प्रशालेच्या दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाला उत्साहात प्रारंभ झाला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर समारंभाचे अध्यक्ष प्रा. डॉ. गणेश मर्गज, प्रमुख पाहुणे निवृत्त पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस, पांग्रड हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक सदानंद तावडे, संस्थेचे उपाध्यक्ष इरशाद शेख, संचालक प्रशांत नेरूरकर, सेक्रेटरी दत्तात्रय परुळेकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेश घाटवळ, प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनीषा डिसोजा, उपमुख्याध्यापिका मानसी आंगणे आदी मान्यवर उपस्थित होते.
पारितोषिक वितरण कार्यक्रमात इयत्ता दहावीतील विद्यार्थी हर्ष किरण बॉलेकर याला सन २०१९-२० चा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन तर प्रणय जयराम गावडे याला बेस्ट प्लेयर, मिताली रत्नाकर नाईक आदर्श विद्यार्थीनी, नीरज अमोल आरोस्कर याला मल्टी टॅलेंट टॅलेंटेड स्टुडन्ट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर गतवर्षीच्या इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. प्रशालेच्या शिक्षिका जुही दत्ताराम आकेरकर-शेरलेकर यांना सन २०१९-२० चा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला.
या कार्यक्रमानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आनंद मेळाव्यामध्ये विविध रुचकर खाद्यपदार्थांची मेजवानी तसेच गेम स्टॉल्स, लकी ड्रॉ असे वेगवेगळे स्टॉल्स आकर्षण ठरले. यावेळी विद्यार्थी तसेच पालक यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. आज १७ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सन्मान आई तुझ्या मातृत्वाला या विद्यार्थ्यांसाठी ठेवलेल्या लकी ड्रॉ ची सोडत यावेळी होणार असल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख यांनी सांगितले. यामध्ये विजेत्या विद्यार्थ्यांच्या हस्ते त्याच्या आईचा पैठणी देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या सावंस्कृतीक कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहनही श्री. शेख यांनी केले आहे.

6

4