Tuesday, February 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याठाण्यात होणार कोकण इतिहास परिषदेचे दहावे राष्ट्रीय अधिवेशन...

ठाण्यात होणार कोकण इतिहास परिषदेचे दहावे राष्ट्रीय अधिवेशन…

वैभववाडी,ता.१८: कोकण इतिहास परिषदेचे दहावे राष्ट्रीय अधिवेशन रविवार दि.२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:३० ते संध्याकाळी ५:३० पर्यंत आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ महाविद्यालय, रघुनाथ नगर, वागळे इस्टेट रोड, ठाणे येथे संपन्न होणार आहे. या अधिवेशनाचे अध्यक्षपद माजी संचालक पुरातत्व व वस्तु संग्रहालय महाराष्ट्र राज्य, डॉ. अरविंद प्र. जामखेडकर भुषविणार आहेत.
या परिषदेत कोकणातील आदिम ते नागर संस्कृतीचा इतिहास या विषयावर अनेक मान्यवर आपआपले शोध निबंध सादर करणार आहेत. या वर्षीचा मानाचा “जीवनगौरव पुरस्कार” सुप्रसिद्ध नाणेतज्ञ शशिकांत गोविंद धोपाटे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच जानेवारी ते डिसेंबर या वर्षात प्रसिद्ध झालेल्या कोकणावरील संशोधन ग्रंथास पुरस्कार देण्यात येतो. या वर्षी तो पुरस्कार ’भारतीय नौकानयनाचा इतिहास’ लेखन डॉ. द. रा. केतकर यांना देण्यात येणार आहे.
दरवर्षी कोकणात इतिहास विषयक कामगिरी करणा-या विशेष व्यक्तीला पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे व निजामशाही, आदिलशाही, टोपीकर इत्यादी राज्यकर्त्यांचे महाराष्ट्रात असलेले साडेचारशेच्या वर किल्ल्यांची अभ्यासपूर्ण भटकंती करणा-या ’हमिदा अन्वर खान’ यांचा परिषदेतर्फे सत्कार होणार आहे. जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोवेली, ता. कल्याण येथे नवव्या राष्ट्रीय अधिवेशनात सादर झालेल्या शोध निबंधांच्या पुस्तकाचे व कोकण इतिहास पत्रिकेचे प्रकाशन होणार असून यावेळी मान्यवर इतिहास लेखकांचे पुस्तकांचे प्रकाशन व्यासपीठावर केले जाणार आहे.
यावेळी छायाचित्र प्रदर्शन, ग्रंथदालन व पुस्तक विक्री स्टॉल व ‘शिवराई’ ठाणे भारतीय दुर्मीळ नाण्यांचे प्रदर्शन यांचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे. प्रा. प्रदीप ढवळ, प्रा.आदित्य दवणे आणि को. इ. प. चे सदस्य दशकपूर्ती राष्ट्रीय अधिवेशनास सज्ज झाले आहेत. तरी सिंधुदुर्ग जिल्हासह कोकण विभागातील प्राद्यापक,संशोधक,अभ्यासक व इतिहासप्रेमी यांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन कोइपचे कार्यवाह श्री. सदाशिव टेटविलकर, कोइप जिल्हा शाखा अध्यक्ष श्री. प्रकाश नारकर व उपाध्यक्ष प्रा. ए. एन. पाटील यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments