लोकांमध्ये मिसळताना अधिकारी पदाची झूल उतरवणे गरजेचे…!

135
2

डॉ.दिलीप पांढरपट्टे; निरोप समारंभ कार्यक्रमात प्रतिपादन…

सिंधुदुर्गनगरी ता.१८: लोकांमध्ये मिसळत असताना अधिकारी पदाची झूल उतरवून लोकांमध्ये मिसळल्यास आयुष्याचा आनंद मिळतो असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे मावळते जिल्हाधिकारी तथा माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी केले.जिल्हा नियोजन समितीच्या नुतन सभागृहात आज मावळते जिल्हाधिकारी डॉ.पांढरपट्टे यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नुतन जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, सावंतवाडीचे प्रांताधिकारी सशांत खांडेकर, कुडाळच्या प्रांताधिकारी वंदना खरमाळे, कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने आदी मान्यवर उपस्थित होते.

मला लोकांमध्ये मिसळण्याची आवड असल्याचे सांगून मावळते जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे म्हणाले की, माणसांच्या शुभेच्छा असतील तर कोणत्याही प्रकारचे काम करता येते, लोकांचे प्रेम आणि योगायोग यामुळेच मला सिंधुदूर्ग सारख्या सुंदर व निसर्ग संपन्न जिल्ह्यामध्ये अनेकवर्षे काम करण्याची संधी मिळाली, इथल्या मातीशी माझे भावनीक नाते आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लोकांमध्ये प्रामाणीकपणा आहे, हा प्रामाणीकपणा फक्त इथल्या कर्मचाऱ्यांमध्येच नाही तर सर्व माणसे आणि मातीमध्येच आहे. सध्याची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी हे उत्कृष्ट काम करत आहे. अनेक प्रकारची कामे करताना त्यांनी चांगली साथ दिली. निवडणूकीसारख्या संवेदनशील कामामध्येही अधिकारी वर्गाने चांगले काम केले. मला माझ्या आधीचे व नंतरचे असे दोन्ही अधिकारी हे चांगले लाभले आहेत. श्रीमती के.मंजूलक्ष्मी यांच्या रुपाने जिल्ह्याला एक कर्तबगार अधिकारी मिळाल्याचेही ते म्हणाले.

यावेळी नुतन जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी म्हणाल्या की, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले असल्यामुळे सर्वांचा चांगला परीचय आहे. एक टीम म्हणून आपण सर्वांनी सोबत काम करूया, एखादी व्यक्ती अधिकारी असूनही किती साधी असू शकते याचे एक चांगले उदाहरण म्हणजे सध्याचे जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे हे आहेत. त्यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, उपजिल्हाधिकारी रोहिणी रजपूत, सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, जिल्हा नगर प्रशासन अधिकारी संतोष जिरगे, मालवणचे तहसिलदार अजय पाटणे, सावंतवाडीचे तहसिलदार राजाराम म्हात्रे, पुरवठा विभागाचे नायब तहसिलदा संजय गवस, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे श्री. सकपाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सुरुवातीस निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाची प्रस्तावना निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले. तर सुत्रसंचालन आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या राजश्री सामंत यांनी केले. आभार प्रदर्शन महसूल शाखेचे तहसिलदार अमोल पाठक यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

4