कणकवली भूमि अभिलेख कार्यालयात चोरीचा प्रयत्न…

177
2

रोख रक्कम सुरक्षित; दस्तऐवजांची चोरी झाल्याची शक्यता…

कणकवली, ता.१८: येथील भूमि अभिलेख कार्यालयात आज चोरीचा प्रकार उघडकीस आला. यात रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित राहिल्या. मात्र सर्वच टेबलावरील दस्तऐवज विस्कटलेले आढळून आले. त्यामुळे चोरट्याने महत्वाचे दस्तऐवज लंपास करण्यासाठी चोरीचा प्रकार केल्याची शक्यता भूमि अभिलेख विभागातून व्यक्त करण्यात आली. याबाबत कणकवली पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार भूमि अभिलेख विभागाने दिली आहे.
आज सकाळी भूमि अभिलेख विभागाचे छाननी लिपिक विश्राम सावंत कार्यालयाजवळ आले असता, कार्यालयाच्या दरवाजा उघड दिसला. त्यामुळे हा चोरीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली. तर भूकरमापक सत्यवान बोलवेकर यांच्यासह इतर भूमि अभिलेख कर्मचार्‍यांनी कणकवली पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांसमक्ष कार्यालयाची पाहणी केली असता, कार्यालयातील रोख रक्कम व इतर मौल्यवान ऐवज सुरक्षित असल्याचे आढळून आले. मात्र प्रत्येक कर्मचार्‍याच्या टेबलमधील आणि टेबलावरील कागदपत्रे विस्कटलेली आढळून आली. त्याचबरोबर ऑफिसमधील कपाटे उघडून महत्वाची कागदपत्रे, नक्कल अर्ज, आवक जावक रजिस्टर, मोजणी प्रकरणे, कार्यालयीन पत्रव्यवहार, तयार केलेल्या नकला आदी कागदपत्रेही विस्कटलेली निदर्शनास आली. त्यामुळे महत्वाची कागदपत्रे लांबवण्यासाठी चोरट्याने हा प्रकार केल्याचे भूकरमापक श्री.बोवलेकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. तसेच सर्व कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर नेमकी कोणती कागदपत्रे गहाळ झाली याबाबतची माहिती समजेल असेही त्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

4