वेंगुर्ल्यातील सेंट लुक्स हॉस्पिटल पुन्हा सुरू होणार…

2

शरद चव्हाण: भाजपाकडून प्रयत्न वर्षभरात सुरू करण्याच्या सूचना…

वेंगुर्ला.ता.२०: वेंगुर्ले येथील सेंट लुक्स हॉस्पिटल पुन्हा सुरू होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.याबाबत धर्मादाय आयुक्तांकडून मान्यता देण्यात आली आहे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी संबंधित संस्थेला एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे.त्या काळात हे रूग्णालय सुरू न झाल्यास भाजपा पुढाकार घेणार आहे.अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजपाचे प्रदेश कार्यालयीन सचिव शरद चव्हाण यांनी दिली
यावेळी बोलताना ते म्हणाले की, आपला वेंगुरल्याशी नातेसंबंध आहे. त्यामुळे याठिकाणी एकेकाळी नावाजलेले हॉस्पिटल बंद अवस्थेत आहे, हे पाहून दु:ख व्हायचे. यासाठी गेल्या दोन वर्षापासून वेगवेगळ्या माध्यमातून हे हॉस्पिटल सुरू होण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी श्रीकांत भारतीय आणि वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख ओमप्रकाश शेटे यांचेही याप्रकरणी लक्ष वेधले होते. त्यांनी या ठिकाणी येऊन हॉस्पिटलची अवस्था पाहून मुख्यमंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा केला होता. यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यवाहीचे आदेश देऊन हे प्रकरण धर्मादाय आयुक्तांकडे न्यायप्रविष्ट झाले होते. धर्मादाय आयुक्तांकडे याबाबत जनसुनावण्याही झाल्या. दरम्यान, सेंट लुक्स ट्रस्टने या रुग्णालयाला पुन्हा सुरु करावे व त्यासाठी त्यांना लागणारी प्रशासकीय मनुष्यबळाची आणि जमेल तेवढी आर्थिक मदत मिळवून देण्याचा आमचा पवित्रा होता. जो आम्ही धर्मादाय आयुक्तांना सुद्धा सांगितला होता.
दरम्यान, ट्रस्टने सेंटलुक्स हॉस्पिटल एका वर्षाच्या आत कार्यान्वित करण्याचे हमीपत्र धर्मादाय आयुक्तांना सादर केले आहे. याबाबत धर्मादाय आयुक्तांनी १५ जानेवारी रोजी याबाबतचे आदेशही दिले आहेत. तसेच या हॉस्पिटलमधील बाह्ररुग्ण तपासणी विभाग हा वेंगुर्ला नगरपरिषद संचलित करण्याबाबत आम्ही ट्रस्टला प्रस्ताव देणार आहोत. तसेच रुग्णालयात प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र सुरु करण्याबाबत प्रस्तावही देणार आहोत.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षात सेंटलुक्स हॉस्पीटल ट्रस्ट वारंवार सांगूनही हे हॉस्पिटल सुरु करु शकलेले नाही. त्यामुळे या एक वर्षाच्या कालावधीत सदर ट्रस्ट कशाप्रकारे हॉस्पिटल सुरु करणार याबाबत विचारले असता मध्यंतरीच्या कालावधीत ट्रस्टची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे हॉस्पिटलचे पुनरुज्जीवन होऊ शकले नाही. मात्र, आत्ता ट्रस्टची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने ट्रस्ट हॉस्पिटल सुरु करण्यास सक्षम असल्याचे ट्रस्टच्यावतीने धर्मादाय आयुक्तांना सांगण्यात आल्याचे श्री.चव्हाण सांगितले. त्यामुळे ट्रस्टला शेवटची संधी द्यावी या विचाराने आम्ही हा प्रस्ताव मान्य केला असून येत्या वर्षभरात ट्रस्टने हॉस्पिटलबाबत कोणतीही हालचाल न केल्यास शासनस्तरावरुन हॉस्पिटल सुरु करण्याच्या पुढील प्रक्रियेस भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याचे शरद चव्हाण यांनी दिली. यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, माजी तालुकाध्यक्ष बाळू देसाई, यांच्यासह भाजपाचे साईप्रसाद नाईक, प्रशांत खानोलकर, संदिप पाटील, मनवेल फर्नांडीस आदी उपस्थित होते.

6

4