दीपक केसरकर; आता आमदारकीच्या काळात जिल्ह्याकडे लक्ष देणार…
सावंतवाडी ता.२०: काहीही झाले तरी चांदा ते बांदा योजना मी बंद पडू देणार नाही,असा विश्वास माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केला.दरम्यान माझ्याकडे यापूर्वी राज्याची जबाबदारी होती त्यामुळे मला जिल्ह्याला हवा तसा वेळ देता आला नाही,मात्र आता मी आमदारकीच्या काळात माझा अतिरिक्त वेळ मंजूर असलेली अपूर्ण विकास कामे पूर्ण करण्यासाठी देईन,असेही त्यांनी सांगितले.आज येथे आयोजित संभाव्य पाणी टंचाई निवारण कृती आराखडा आढावा बैठकी दरम्यान श्री.केसरकर बोलत होते.
श्री.केसरकर यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आलेली चांदा ते बांदा योजना महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातून बंद करण्यात आली आहे.या विषयावरून जोरदार वाद-विवाद रंगले आहेत.या बाबत आज येथे आयोजित बैठकीत श्री.केसरकर यांनी ही योजना बंद पडू देणार नाही,असा विश्वास व्यक्त केला.तसेच जास्तीत-जास्त लाभार्थ्यांनी ३१ जानेवारी पर्यंत या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहनही त्यांनी केले.