मालवण मधील “सी-वर्ल्ड” प्रकल्प अन्यत्र हलविण्याच्या हालचाली सुरू…

222
2

राज्यात शोधणार पर्यायी जागा;फेब्रुवारीत खाजगी विकासकांची बैठक…

सावंतवाडी/दत्तप्रसाद पोकळे.ता,२१: येथील मालवण येथे प्रस्तावित असलेला देशातील पहिला “सी वर्ल्ड” प्रकल्प राज्यात अन्यत्र हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.सी वर्ल्ड साठी राज्यात पर्यायी जागेची निवड करण्यासाठी फेब्रुवारी मध्ये राज्य शासनाचा पर्यटन विभाग थेट खासगी विकासकांना आमंत्रित करणार आहे.सी वर्ल्डसाठी राज्यात पर्यायी जागा शोधून हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी खासगी विकासकांकडे दिली जाणार आहे.यापूर्वी मालवण येथे अमेरिकेतील “ओसीनारियम” च्या धर्तीवर साकारला जाणारा सी वर्ल्ड प्रकल्प विविध कारणांमुळे २००९ पासून रखडला आहे.
२००९ मध्ये मालवण येथे अमेरिकेतील ओसीनारियमच्या धर्तीवर समुद्र विश्वाचे दर्शन घडविणारा देशातील पहिला सी वर्ल्ड प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता.या प्रकल्पासाठी १,३९० एकर जागेचे अधिग्रहण केले जाणार असल्याने हा प्रकल्प सुरुवातीलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला.अमेरिकेत जगातील सर्वात मोठे सी वर्ल्ड प्रकल्प ३०० एकर पेक्षा कमी क्षेत्रात आहेत.मग मालवण मधील सी वर्ल्ड साठी चौपटीने जागा कशी काय लागणार,असा सवाल उपस्थित करण्यात आला.त्यानंतर सी वर्ल्ड च्या नावावरच घेण्यात आलेला आक्षेप, “पेटा” या संस्थेचा विरोध,सी वर्ल्डची जबाबदारी असलेल्या पुणे येथील संस्थेकडून केला जाणारा वेळकाढूपणा व जमीन अधिग्रहण करण्यात आलेले अपयश, यामुळे मालवण येथील हा प्रकल्प गेली अनेक वर्षे रखडला आहे.
पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यात सी वर्ल्ड महत्वाची भूमिका बजावू शकतो,त्यामुळे पर्यटक विभागाने सी वर्ल्ड प्रकल्पासाठी नवीन जागा व नवीन आराखडा तयार करण्याच्या दिशेने पाउले टाकण्यास सुरुवात केली आहे.सी वर्ल्ड प्रकल्पसाठी विदेशी गुंतवणूक महत्वाची आहे.त्याआधी सी वर्ल्डचे नवीन स्थान निश्चित होणे गरजेचे आहे.राज्यात सी वर्ल्ड साठी योग्य स्थान निवडण्यासाठी पर्यटन विभाग आता खासगी विकासकांना आमंत्रित करणार आहे.फेब्रुवारी महिन्यात या प्रक्रियेला प्रारंभ होणार असल्याचे पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

4