सिंधुदुर्गच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करुया…

204
2

उदय सामंतांचे आवाहन; जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न…

सिंधुदुर्गनगरी ता.२१: जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करुयात असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहामध्ये आज जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली.यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपिठावर माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, माजी गृह राज्यमंत्री तथा सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, कुडळाचे आमदार वैभव नाईक, कणकवलीचे आमदार नितेश राणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा समिधा नाईक जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मे महिन्यापर्यंत विमानतळ सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष उदय सामंत म्हणाले की, जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्यात येतील. यावेळी अध्यक्ष मोहदयांनी विकासकामांमध्ये कोणावरही अन्याय होणार नाही याची ग्वाही दिली.३१ मार्च २०२० पर्यंत जिल्हा नियोजन मधील सर्व निधी खर्च व्हावा,यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत,लोकप्रतिनिधीनीही यासाठी सर्व ताकद लावावी,सवलतीच्या दरात वीज पुरवठ्याचा प्रस्ताव संबंधीत विभागाने मंजूर करून आणावा, तिलारी येथील बीएसएनएलचा टॉवर तातडीने सुरू करावा,जिल्ह्यात सर्वत्र मोबाईल नेटवर्क व्यवस्थित मिळेल यासाठी बीएसएनएलने प्रयत्न करावेत,मंगेश पाडगावकरांच्या स्मारकांसाठी जागेचा प्रश्न लवकर मार्गी लावावा,भूमिगत विज वाहिन्यांचे काम त्वरीत पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करावी, जलयुक्त शिवारच्या कामांविषयी नियोजन समिती सदस्यांसोबत पाहणी करुन त्याचा अहवाल सभागृहात सादर करावा, जलयुक्त शिवार मधील कामांची देयके त्रयस्थ समितीचा अहवाल अल्याशिवाय देऊ नये या निर्णयाची अंमलबजावणी करावी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीचे वसतीगृहाचा प्रस्ताव नव्याने सादर करावा, पाटबंधारे विभागाची यंत्रसामग्री जिल्ह्यातच ठेवावी व नद्यांमंधील गाळ काढण्यासाठीच्या कामी त्याचा वापर करावा, याकामी यांत्रिकी विभागाने स्थानिक लोक प्रतनिधींशी चर्चा करावी, रस्त्यांच्या कडेला असलेली धोकादायक व सुकलेली झाडे तोडण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, कृषि पंपांच्या जोडणीचे प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर कार्यवाही करुन शेतकऱ्यांना तातडीने कृषिपंपांची जोडणी देण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशा सूचना पालकमंत्री तथा नियोजन समितीचे अध्यक्ष उदय सामंत यांनी केल्या.
यावेळी पालकमंत्री श्री. सामंत यांनी विकास निधीच्या वाटपामध्ये समानता राखण्यात येणार असल्याचे सांगत, सर्व लोक प्रतिनिधींना योग्य प्रकारचे समान निधीचे वाटप करण्यात येईल असे सांगितले. तसेच सर्व लोक प्रतिनिधींनी त्यांच्या विभागातील कामांची यादी वेळेत जिल्हाधिकारी यांच्याकडे द्यावी अशाही सूचना पालकमंत्री श्री. सामंत यांनी केल्या. शेवटी अध्यक्ष श्री. सामंत यांनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये समितीची बैठक संपन्न झाल्याबद्दल उपस्थित सर्व लोक प्रतिनिधी व समिती सदस्य यांचे अभिनंदन केले.
माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुधारण्याबाबत सुचना मांडली, जिल्ह्यात डॉक्टर्स आले पाहिजेत त्यासाठी त्यांच्या वेतनामध्ये वाढ करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच जिल्ह्याच्या पर्यटन वाढीच्या दृष्टीने चिपी विमानतळ, सी वर्ल्ड हे प्रकल्प व विकासाच्या दृष्टीने आडाळी एम.आय.डी.सी, सिंधुदुर्गनगरी येथील आय.टी.पार्क हे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावेत अशी मागणी केली.
आमदार नितेश राणे यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामांच्या चौकशीची मागणी केली. त्यास अध्यक्ष श्री. सामंत यांनी मान्यता दिली.
यावेळी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रक्कमेत वाढ करण्याबाबतचा ठाराव मंजूर करण्यात आला.सुरुवातीस जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर निधन झालेले मान्यवर व शहिद जवानांना श्रद्धांजली वाहन्यात आली. आभार प्रदर्शन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले.

4