कणकवली नगरवाचनालयात सहाव्या वर्षी आयोजन..
कणकवली, ता.२१: येथील नगरवाचनालयात झालेल्या नाथ पै वक्तृत्व स्पर्धेत वैष्णवी दिगंबर मुणगेकर हिने प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय क्रमांक दीक्षा अरुण वारंग आणि तृतीय क्रमांक हर्षाली सुशांत आळवे यांना मिळाला. उत्तेजनार्थ क्रमांकसाठी संकेत सत्यवान मडव, प्रेरणा सचिन खेडेकर यांची निवड करण्यात आली.
बॅ. नाथ पै यांचे जीवनचरित्र आणि कार्याच्या परिशीलन उमलत्या वयातील विद्यार्थ्यांना व्हावे यासाठी नगरवाचनालयातर्फे गेली सहा वर्षे कै.आनंद आळवे यांच्या आर्थिक नियोजनातून ही स्पर्धा घेतली जात आहे. नगरवाचनालयाच्या सभागृहात झालेल्या यास्पर्धेतील विजेत्यांना वाचनालयाचे कार्यवाह हनीफ पिरखान, माजी अध्यक्ष डी. पी. तानावडे, सदस्य राजेंद्र सावंत, सहकार्यवाह मेघा गांगण, वैजयंती करंदीकर,दत्तात्रय मुंडे, गीतांजली कुलकर्णी आदींच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. यावेळी वसुधा माने यांनी कै.उमा पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काही ग्रंथ वाचनालयास भेट दिले. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण दत्तात्रय मुंडे, गीतांजली कुलकर्णी यांनी केले. जिल्ह्यातील २० स्पर्धकांनी यात सहभाग घेतला.