आंबा बागायतदार आबा फोंडेकर यांना मिळाला पहिला मान…
मालवण, ता. २१ : कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार सूर्यकांत ऊर्फ आबा फोंडेकर यांच्या बागेतून हापूस आंब्याची पहिली पेटी कोल्हापूरला रवाना झाली आहे. जिल्ह्यात प्रथमच जानेवारी महिन्यात हापूसची पहिली पेटी कोल्हापूर मार्केटला पाठविण्यात आली आहे.
अवकाळी पावसामुळे यावर्षी आंब्याचे पीक उशिराने येण्याची शक्यता आंबा बागायतदारांमधून व्यक्त करण्यात येत होती. मात्र कुंभारमाठ येथील फोंडेकर यांच्या बागेतील ऑक्टोबर महिन्यात आलेल्या मोहोराचे जानेवारी महिन्यात फळात रुपांतर झाले आहे. यात चार डझन हापूस आंब्याची पहिली पेटी कोल्हापूर मार्केटमध्ये पाठविण्यात आली. गतवर्षीही फोंडेकर यांनी जिल्ह्यातून सर्वप्रथम हापूस आंब्याची पेटी मार्केटमध्ये रवाना केली होती.
ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसामुळे अनेक आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात मोहोर गळून गेल्याने आंबा हंगाम पुढे गेला आहे. आता आंबा हंगाम एक टप्प्यात न होता तीन ते चार टप्प्यात विभागला गेला आहे. यातही पहिल्या टप्प्यात हापूस आंब्याची पहिली पेटी पाठविण्याचा मान फोंडेकर यांना मिळाला आहे.