अन्य तीन संशयित अद्यापही फरार; सूत्रधाराच्या शोधात वनविभाग…..
सावंतवाडी ता.२१:खवले मांजराची तस्करी केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या आठ संशयितांना आज येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.याप्रकरणी काल दोघांना ताब्यात घेण्यात आले होते.तर अन्य ६ जणांना यापूर्वी अटक करून त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली होती.दरम्यान आज आठही संशयितांना येथील न्यायालयात हजर करण्यात आले.या प्रकरणातील अन्य तीन संशयित अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे,अशी माहिती,या गुन्ह्याचे तपासी अधिकारी गजानन पानपट्टे यांनी दिली.
ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण आणि सावंतवाडी वनविभागाच्या पथकाने मंगळवार दिनांक १४ जानेवारी रोजी सायंकाळी माडखोल-सावली धाबा परिसरात केली होती.यात पाच संशयितांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले होते.यातील चार जणांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी देण्यात आली होती.तर एकाची प्रकृती खालावल्यामुळे त्याच्यावर उपचार करून दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर करण्यात आले होते.मात्र त्याला बंधनपत्रावर सोडण्यात आले.तर अन्य संशयितांना तपासादरम्यान ताब्यात घेण्यात आले.या प्रकरणात ताब्यात असलेल्या चंद्रकांत लक्ष्मण परब (५३)रा.आंबेगाव-सावंतवाडी, धोंडी सहदेव लाड(६७) रा.गोठोस-कुडाळ, विकास प्रकाश चव्हाण (३५) रा.वारगाव-कणकवली,संतोष गेणू चव्हाण(३७) रा.मालवण,उमेश बाळा मेस्त्री (६५),रा.बांदा,उदय श्रीकृष्ण शेट्ये(४९) रा.लांजा-रत्नागिरी,सुनील चंद्रकांत कडवेकर(२१) रा.कोल्हापूर,मधुकर वसंत राऊळ(३५) रा.माडखोल-सावंतवाडी अशी ताब्यात असलेल्या संशयितांची नावे आहेत.या आठही चौकशी त्यांना आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते .यावेळी त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.



